Parliament Monsoon Session 2025 – SIR टराटरा फाडून डस्टबिनमध्ये टाकले…, सलग पाचव्या दिवशी विरोधकांचं आंदोलन; कामकाज दिवसभरासाठी तहकूब

बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या मतदार याद्या पडताळणीच्या मुद्द्याचे पडसाद संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्या दिवसापासून दिसून येत आहेत. मतदार याद्यांच्या फेरतपासणीच्या नावाखाली केंद्रीय निवडणूक आयोगाने तब्बल 51 लाखांहून अधिक मतदारांची नावे वगळली. यामुळे संतापलेल्या विरोधकांनी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशीही सरकार विरोधात निदर्शने दिली. यावेळी विरोधी पक्षाच्या खासदारांनी गांधी पुतळ्यापासून नवीन संसद इमारतीचे प्रवेशद्वारापर्यंत मोर्चा काढला.

सरकार विरोधात विरोधकांनी काढलेल्या मोर्च्यात लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी तसेच मल्लिकार्जुन खरगे, वर्षा गायकवाड यांनीही सहभाग घेतला. यावेळी त्यांनी बिहारमधील मतदार याद्यांची विशेष फेरतपासणी मोहीमेचा निषेध करत SIR लिहिलेले पोस्टर फाडून एका प्रतिकात्मक कचऱ्याच्या डब्यात फेकले आणि मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. तसेच लोकसभेतही विरोधकांनी घोषणाबाजी केल्यामुळे सभापती ओम बिर्ला यांनी तातडीने बैठक बोलावून सभागृहाचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केले. गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. दरम्यान, गदारोळाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहातील नेत्यांची बैठक बोलावली. ज्यामध्ये सोमवारी ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यासाठी एकमत झाले. पुढील आठवड्यापासून कनिष्ठ सभागृहाचे कामकाज सुरळीत चालेल अशी आशा यावेळी बिर्ला यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान खोटारड्यांचे सरदार, देशाची दिशाभूल करत आहेत; काँग्रेस अध्यक्ष खरगे यांची टीका

SIR विरुद्ध आमचा लढा सुरूच राहील- मल्लिकार्जुन खरगे

सरकार विरोधात सुरू असलेल्या आंदोलनात मल्लिकार्जुन खरगेही सहभागी झाले होते. सरकार गरिबांना त्यांच्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवू इच्छितात. त्यांना फक्त उच्चभ्रू वर्गाला मतदान करू द्यायचय. हे सरकार संविधानाचे पालन करत नाहीए, अशी टीका खरगे यांनी केली.