
कांद्याचे भाव गगनाला भिडलेले असताना आणि दलाल व्यापारी जनतेची व शेतकऱयांची लयलूट करत असताना केंद्रातले मोदी सरकार मात्र ढिम्म असल्याचा आरोप करत मंगळवारी विरोधकांनी राज्यसभेत कांद्यावरून सरकारचा चांगलाच वांदा केला.
राज्यसभेत माकपाचे सदस्य के. के. रागेश यांनी कांद्याच्या वाढत्या किमतीवरून सरकारला धारेवर धरले. 32 हजार टन कांदा सडून वाया गेल्याचे सरकारनेच एका निवेदनादवारे स्पष्ट केले आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावरील कांदा वाया कसा गेला, सरकारने त्यावर काही उपाययोजना का केली नाही. हा कांदा बाजारात आला असता तर आज किमती एवढय़ा गगनाला भिडल्या नसत्या. या सगळ्या परिस्थितीचा फायदा उठवत दलाल व व्यापाऱयांनी देशाला वेठीस धरले आहे. त्यासाठी मोदी सरकारचा ढिम्म कारभार जबाबदार असल्याचा आरोपही रागेश यांनी केला.
अध्यक्षांनी रावसाहेब दानवेंचे कान उपटले
लोकसभेत मंगळवारी शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांचा अन्न व प्रक्रिया खात्यासंदर्भातील प्रश्न व्यवस्थित ऐकता न आल्यामुळे केंद्रीय अन्न व प्रक्रिया राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची चांगलीच फटफजिती झाली. गोडसे यांच्या प्रश्नाकडे दानवेंचे बहुधा लक्ष नसावे. त्यामुळे उत्तर देताना ते गडबडले आणि पुन्हा प्रश्न विचारण्याची विनंती केली. त्यावेळी अध्यक्ष ओम् बिर्ला यांनी मंत्रीजी सवाल तो ध्यान से सुनिए, असे सांगत प्रश्न रिपिट करण्यास मनाई केली. यावेळी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी गोडसेंना उपप्रश्न विचारण्यास सुचविले. त्यानंतर आजारी असूनही या खात्याचे कॅबिनेट मंत्री रामविलास पासवान यांनी उत्तर दिले.

























































