वीज बिल थकबाकीदारांचे कनेक्शन कापा! महावितरणच्या प्रादेशिक कार्यालयाचा अधिकाऱ्यांना मेसेज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वीज बिलाची वाढलेली थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने आता कडक कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार स्थानिक पातळीवर काम करणाऱया प्रत्येक लाइनमनला दिवसाला 25 वीजबिल थकबाकीदारांचे कनेक्शन कापण्याचे टार्गेट द्यावे, तसेच दररोज त्याचा अहवाल द्यावा, असा मेसेज प्रादेशिक कार्यालयातून संबंधित अधिकाऱयांना दिला आहे.

महावितरणचे राज्यभरात जवळपास अडीच कोटी वीज ग्राहक आहेत. त्यापैकी जवळपास पावणेदोन कोटी वीज ग्राहकांकडे 55 हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. तसेच राज्यात दुसऱया लॉकडाऊनपासून म्हणजे एप्रिल, मे महिन्यापासून थकबाकीदारांची संख्या वाढत आहे. त्याची गंभीर दखल घेत महावितरणच्या प्रादेशिक विभागीय कार्यालयांनी लेखी परिपत्रक न काढता परिमंडळ आणि मंडळ कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱयांना मोबाईलद्वारे मेसेज देत दोन महिन्यांपेक्षा जास्त वीज बिल थकीत असलेल्या घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना दोन दिवस आधी थकीत बिल भरण्याबाबत पूर्वसूचना द्यावी. त्यानंतरही बिल भरले न गेल्यास तत्काळ वीज पुरवठा खंडित करावा, असे बजावले आहे. त्यासाठी प्रत्येक लाइनमनला दिवसाला 25 ग्रहकांचा वीज पूर्वरवठा खंडित करण्याचे टार्गेट द्यावे असेही सदर मेसेजमध्ये स्पष्ट केले असल्याचे महावितरणच्या एका वरीष्ठ अधिकाऱयाने सांगितले.

लइनमनला करावा लागतोय ग्राहकांच्या रोषाचा सामना

लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून अनेक नागरिक घरात बसून आहेत. त्यामुळे त्यांना वीज बिल भरणे शक्य झालेले नाही. आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता येताच महावितरणकडून थकबाकीदारांवर कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार लाइनमन जेव्हा प्रत्यक्ष वीज कनेक्शन कापण्यासाठी जातो तेव्हा त्याला ग्राहकाच्या रोषाचा सामना करावा लागत असल्याचे महाराष्ट्र कंत्राटी वीज कामगार संघाचे अध्यक्ष नीलेश खरात यांनी सांगितले.