गुन्हे वृत्त- ऑनलाइन वाईन मागवणे पडले महागात

दिवाळी पार्टीसाठी ऑनलाइन वाईन मागवणे कंपनीच्या पदाधिकाऱयाला चांगलेच महागात पडले. वाईनच्या नावाखाली ठगाने पावणे सात लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

तक्रारदार हे एका खासगी कंपनीत काम करतात. दिवाळीनिमित्त त्याच्या कंपनीचा एक कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रम असल्याने त्यांना वाईनची ऑर्डर द्यायची होती. ऑर्डर देण्यासाठी त्याने मुंबईतील एका प्रसिद्ध दारू विक्री करणाऱया वाइन शॉपचा नंबर सर्च केला. त्यांना एक नंबर दिसला. त्या नंबरवर त्याने फोन केला. फोनवर बोलणाऱ्याने त्याचे नाव सांगून तो मॅनेजर असल्याचे भासवले. चर्चेदरम्यान तक्रारदार याने वाईनची डिलिव्हरीबाबत चौकशी केली. त्यानंतर ठगाने त्यांना ऑर्डर वेळेवर देऊ असे भासवले. ठगाने त्यांना व्हॉट्सअॅपवर दरपत्रक पाठवले. दरपत्रक पाठवल्यानंतर काही वेळाने  ठगाने ऑर्डरचे 9 लाख रुपये बिल झाले असे सांगितले.

एकूण बिलापैकी 50 टक्के रक्कम ऑर्डर बुकिंगवेळी आणि उर्वरित रक्कम ऑर्डर दिल्यावर असे त्यांना भासवले. ठगाने पाठवलेल्या इन बॉक्समध्ये जीएसटीचा उल्लेख होता. जीएसटीचा उल्लेख असल्याने त्याने तपासणी केली. विश्वाससाहर्ता वाटल्याने त्याने कोणत्या खात्यात पैसे पाठवायचे असे विचारले. ठगाने पाठवलेल्या एका खात्यात सुरुवातीला साडेचार लाख रुपये पाठवले. पैसे पाठवल्यानंतर दीड तासात ऑर्डर मिळेल असे त्यांना सांगण्यात आले. तक्रारदार याने त्याना वाईनच्या लायसन्सबाबत विचारणा केली. तेव्हा ठगाशी त्यांची लायसन्सवर चर्चा झाली. काही वेळाने ऑर्डरवरून ठगाने भांडण करून तक्रारदार यांना 2 लाख 25 हजार रुपये भरण्यास सांगितले.

मुलीची हत्या करणाऱया पित्याला अटक

कौटुंबिक वादातून पोटच्या मुलीची हत्या करून बिहारला पळून गेलेल्या पित्याला अखेर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. मोहम्मद सुलेमान कुजरा असे त्याचे नाव आहे.

मोहम्मद हा पत्नी नसीमा आणि मुलगी अजगरी हिच्यासोबत वाकोला परिसरात राहत होता. त्याला दारूचे प्रचंड व्यसन होते. त्यावरून त्या दोघांची भांडण होत असायची. गेल्या बुधवारी मोहम्मद सुलेमानचा पत्नीसोबत वाद झाला. त्या रागाच्या भरात त्याने पत्नीला आणि मुलीला बेदम मारहाण केली. त्या मारहाणीत त्या दोघी जखमी झाल्या. मारहाण केल्यानंतर मोहम्मद हा पळून गेला होता.  गुरुवारी दुपारी हा प्रकार एका स्थानिक रहिवाशाच्या लक्षात आला. त्याने याची माहिती वाकोला पोलिसांना दिली. पोलिसांनी त्या दोघींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी अजगरीला मृत घोषित केले, तर नसीमा हिच्यावर उपचार सुरू आहेत.

नोकरीच्या नावाखाली केली फसवणूक

लंडनमध्ये नोकरीच्या नावाखाली नेपाळी जोडप्याची 27 लाखांची फसवणूक झाल्याची घटना घडली. घडल्या प्रकरणी  कांदिवली पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. त्या दोघांच्या अटकेसाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. तक्रारदार हे मूळचे नेपाळचे रहिवासी आहेत. गेल्या वर्षी त्यांची दोघांशी ओळख झाली. भेटी दरम्यान त्याने त्याची पंपनी असल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्याने तक्रारदार आणि त्याच्या पत्नीला लंडनमध्ये नोकरी आणि व्हिसा मिळवून देऊ असे सांगितले होते. त्यावर विश्वास ठेवून त्याने एकूण 27 लाख 44 हजार रुपये दिले होते. पैसे देऊन ते तक्रारदार यांना नोकरी आणि व्हिसा देत नव्हते. तसेच वारंवार विचारणा केली असता ते दोघे टाळाटाळ करत होते. फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच त्याने कांदिवली पोलीस ठाण्यात धाव घेतली.