अवयवदानात महाराष्ट्र अव्वल

213

>> नमिता वारणकर

जगभरात ‘अवयवदान’ही चळवळ राबवली जाते. ही चळवळ परिणामकारक उभी करणाऱया महाराष्ट्राला नुकताच केंद्र सरकारकडून नुकताच सर्वोत्तम राज्याचा पुरस्कार मिळाला.

शरीराच्या प्रत्येक अवयवाची गरज जशी जिवंतपणी असते…तशीच ती व्यक्तिच्या मृत्यूपश्चात इतरांना व्हावी यासाठी जगभरात ‘अवयवदान’ही चळवळ राबवली जाते. ही चळवळ परिणामकारक उभी करणाऱया महाराष्ट्राला नुकताच केंद्र सरकारकडून सर्वोत्तम राज्याचा पुरस्कार मिळाला. राष्ट्रीय दिनानिमित्त दिल्लीत ‘नॅशनल ऑर्गन अँण्ड टिशू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन’ (नोटो) तर्फे महाराष्ट्राचा गौरव करण्यात आला…हा पुरस्कार म्हणजे अवयवदानाच्या जनजागृतीसाठी केलेल्या प्रयत्नांचा सन्मान आहे. याविषयी डोंबिवली येथील ‘फेडरेशन ऑफ बॉडी अँण्ड ऑर्गन डोनेशन’ या संस्थेचे अध्यक्ष विनायक जोशी सांगतात, महाराष्ट्रात या विषयावर कार्य करणाऱया जेवढय़ा एनजीओ आहेत, त्यांनी खोलवर केलेल्या प्रसाराचे हे यश आहे. मदरसे, शाळा, महाविद्यालय अशा ठिकाणी तरुण पिढीच्या माध्यमातून हा परिणाम साधला गेला आहे.

अवयवदानाच्या संख्येत वाढ होण्यासाठी गेल्या काही वर्षांत कसे प्रयत्न सुरू आहेत, यावर त्यांचे म्हणणे आहे की, जिथे मोठय़ा प्रमाणात लोकांची गर्दी आढळते उदा. उत्सव, जत्रा अशा ठिकाणी आमचे कार्यकर्ते स्टॉल लावतात, पत्रक लावतात, बॅनर्स लावून आम्ही लोकांमध्ये या विषयाबाबत गेल्या काही वर्षांपासून जनजागृती करत आहोत. सरकारी पातळीवरील संस्थांचाही या कार्यात हातभार लागला आहे. शिवाय वर्तमानपत्रातील माहिती, मासिकांमधील लेख, सोशल साईट्स, या नव्या माध्यमांद्वारेही जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही पोहोचून त्यांना अवयवदान करण्यासाठी प्रेरणा देत आहोत. ‘देहदान शंका समाधान’ या पुस्तकात नागरिकांना अवयवदानाबाबत परिपूर्ण माहिती मिळते. शिवाय हे पुस्तक वाचून झाल्यावर ते एखाद्या वाचनालयाला भेट देऊ शकतात. त्यामुळे बऱयाच जणांना वाचायला मिळतं. ‘प्रचार आणि प्रसार’ हेच आमचे उद्दिष्ट आहे. आज देहदान मंडळाद्वारे बरेच लोकं अवयवदानासाठी नोंदणी करत आहेत. ‘देहदानपत्रिका’ ही मासिक प्रकाशित करून ही लोकांना आवाहन करण्यात येते.

आज समाजात खूप वेगाने बदल होत आहेत. शिवाय सध्या मोठमोठय़ा आपत्ती होण्याच्या प्रमाणातही वाढ होत आहे. यामध्ये भूकंप, आग लागणे, इमारत किंवा भिंत पडणे अशा अनेक दुर्घटना घडतात. यात अनेक निष्पाप जखमी होतात. अशावेळीही वेगवेगळ्या अवयवांची गरज भासते.ज्यांना त्वचेची गरज आहे, त्यांना त्वचा किंवा डोळे मिळाल्यावर ज्यांना जग दिसल्याचा आनंद होतो तो प्रत्यक्ष ज्याने दान घेतलं आहे किंवा ज्यांना अवयव मिळाले आहेत, अशांना आम्ही आमच्या कार्यक्रमात बोलवतो. जेणेकरून इतरांनाही अवयवदानाविषयी विश्वास वाढेल, असे ते सांगतात.

अवयवदानाबाबत कायदा व्हावा…
या विषयाबाबत आजही समाजात अंधश्रद्धा आहेत का ? यावर ते सांगतात, हो आहेत. विशेषतः ग्रामीण भागात आहेत. काही लोकांना असं वाटतं, एक अवयव आम्ही दान केला तर त्याऐवजी आम्हाला दुसरा अवयव मिळणार आहे किंवा काही जणांना एका किडनीवर आपण जगू शकतो यावर विश्वास नसतो. असे काही गैरसमजही आहेत. त्यासोबतच प्रगत राष्ट्रांत ज्याप्रमाणे अवयवदानाबाबत कायदा आहे, तसा कायदा आपल्या देशातही झाला तर ही चळवळ अजून पुढे जाऊ शकते.

कायदेशीररीत्या बंधनकारक
या विषयाबाबत आवश्यक असलेल्या कायदेशीर कृतींविषयी ते माहिती देतात, अवयवदानाचा फॉर्म भरल्यानंतकाही काही प्रक्रिया कायदेशीररित्या बंधनकारकर असतात. आपल्या जवळच्या नातेवाईकाची आणि इतर कुणाचीही सही चालू शकते, मात्र तोही महत्त्वाचा माणूस असला पाहिजे, जेणेकरून आपल्या मृत्यूनंतर देहाची विल्हेवाट लावण्याकरिता सही केलेल्या व्यक्ती वैचारिकदृष्टय़ा सक्षम असणं अत्यंत आवश्यक आहे. शिवाय ते मनानेही स्थिर असावेत तरच या कृती ते करू शकतात, नाहीतर वेळप्रसंगी त्यांची मानसिकता डळमळीत होऊ शकते. शिवाय पूर्वी पाच साक्षीदारांची गरज असायची, तर आता फक्त दोनच साक्षीदार फॉर्मवर सही करण्यासाठी लागतात. यासोबत त्यांचं समुपदेशन, शंकानिरसनही केलं जातं.

अवयवदानासाठी पदयात्रा…
अवयवदानाबाबत जगभरात जागृती होतेय. फक्त त्याचं प्रमाण आजही कमी आहे. यासाठी वारंवार लोकांपर्यंत पोहोचून अवयवदानाचे महत्त्व पटवून देण्याची गरज आहे. यासाठी लिखीत माध्यमांनी याविषयाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. याकरिता आम्ही महाराष्ट्रात विविध ठिकाणी पदयात्राही काढतो. यंदा आम्ही यवतमाळपर्यंत प्रवास करणार आहोत. पदयात्रेच्या माध्यमातून आम्ही चालू शकतील, बोलू शकतील, राहू शकतील असे आमचे कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी होऊन गावोगावच्या लोकांना या विषयाबाबत सांगतील. रोटरी, लायन्स या संस्थाही आम्हाला या कार्यासाठी मदत करतात. याद्वारे ग्रामीण लोकांपर्यंत पोहोचता येतं. त्यांच्याशी संवाद साधणं, पत्रकं वाटणं अशी कार्ये करता येतात. विशेषतःपत्रकही प्रवास करताना सहप्रवाशाला द्या, असेही आम्ही सांगतो कारण याद्वारे साखळी पद्धतीने अवयवदानाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचता येते, महत्त्वाचे म्हणजे आम्ही दिवसाचे चोविस तास फोनद्वारेही लोकं आमच्याशी संपर्क करू शकतात, अशी माहिती विनायक जोशी देतात.

आपली प्रतिक्रिया द्या