तीन कुटुंबांनी अवयवदानाने साजरी केली दिवाळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिवाळीत दिव्यांच्या रोषणाईचा आनंद दोन अंध व्यक्तींना लुटता यावा यासाठी नाशिकमध्ये राहणाऱया एका कुटुंबाने अवयवदानाचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 65 वर्षीय महिलेच्या अवयवदानामुळे दोघांना नव्याने दृष्टी आणि एका व्यक्तीला नवजीवन मिळण्यास मदत झाली आहे.

22 ऑक्टोबर रोजी नाशिकमध्ये राहणाऱया 65 वर्षीय भारती देवरे दिवाळीचे काम करत असताना घरी पाय घसरून पडल्या. डोक्याला मार लागल्याने त्यांना ताबडतोब जवळच्या सुयश रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी त्यांच्यावर शस्त्र्ाक्रिया करण्यात आली. मात्र डोक्याला मोठी दुखापत झाल्याने त्यांना ब्रेनडेड घोषित करण्यात आले.

भारती यांचे पती मधुकर देवरे म्हणाले, आम्हाला अवयवदानाबाबत माहिती होती. त्यामुळे ब्रेनडेड झाल्यानंतर आम्ही अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही डोळे आणि यकृत हे अवयवदान करण्यात आले आहे.

– अवयवदानासाठी रुग्णाला सिक्स सिग्मा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी त्यांचे दोन्ही डोळे आणि यकृत अवयव दान करण्यात आले. दोन्ही डोळे सुशील आय रुग्णालयात दान करण्यात आले आहेत. तर यकृत ग्रीन कॉरिडोर तयार करून पुण्यातील डी. वाय. पाटील रुग्णालयातील एका रुग्णाला प्रत्यारोपणासाठी देण्यात आले आहे.