यूटय़ूब पाहून गच्चीवर फुलवला सेंद्रिय भाज्यांचा मळा! रजनी भारद्वाज यांचा हटके प्रयोग

यूटय़ूबला गुरू मानून लुधियानामधील एका सर्वसामान्य गृहिणीने आपल्या घराच्या छतावर सेंद्रिय भाजीपाल्याचा मळा फुलवला आहे. या महिलेने कोबी, मिरची, लिंबू अशा भाज्यांसह चक्क स्ट्रॉबेरीदेखील छतावर पिकवली आहे. महत्त्वाचे म्हणजे खत म्हणून तिने किचनमधील ओला कचरा आणि लस्सीचा स्प्रे याचा वापर केला आहे. रजनी भारद्वाज या गृहिणीने केलेल्या हटके प्रयोगामुळे भलेभले शेतकरी अचंबित झाले आहेत.

झटपट उत्पादन मिळविण्यासाठी फळे आणि भाज्यांच्या लागवडीसाठी रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा अतिवापर होत आहे. याचे परिणाम मानवी आरोग्यावर होत आहेत. त्यामुळे सेंद्रिय शेतीचे महत्त्व वाढले आहे. अशाच रासायनिक प्रक्रिया केलेल्या भाजीपाल्यापासून आपल्या कुंटुंबाचा बचाव करण्यासाठी पंजाबच्या फतेहगड साहिब जिह्यातील कस्मा खमाणो इथल्या रजनी भारद्वाज यांना सेंद्रिय शेतीची कल्पना सुचली. शेतीचे फारसे ज्ञान नसल्याने त्यांनी यू-टय़ूबवरून माहिती मिळवली. त्यानुसार घराच्या छतावर त्यांनी सेंद्रिय शेतीचा प्रयोग केला.

परदेशी भाज्याही पिकवल्या

1700 चौरस फूट जागेवर त्यांनी ही शेती फुलवली आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांनी आपल्या छतावर मटार, घोसाळे, फ्लॉवर, कोबी, टोमॅटो, सिमला मिरची, स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले आहे. आता अनुभवाच्या जोरावर त्यांनी ब्रोकोली, झुकिनीसारख्या परदेशी भाज्यादेखील पिकवायला सुरुवात केली आहे.

ओला कचरा अन् लस्सीचा स्प्रे

भाज्या पिकविण्यासाठी त्या खत म्हणून किचनमधील ओला कचरा आणि लस्सीचा स्प्रे याचा वापर करतात. किचनमधील ओला कचरा दीड महिने सुकवून खत तयार करतात.  तसेच शिळ्या लस्सीचा स्प्रे भाजीपाल्यांवर शिंपडल्यावर पीक चांगले येते असे रजनी यांचे निरीक्षण आहे.

आपली प्रतिक्रिया द्या