घाटंग्री शिवारात घुसला बिबटय़ा, थोड्याच वेळात बेशुद्ध होऊन झाला मृत्यू

धाराशिव शहरापासून अवघ्या सात ते आठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या घाटंग्री शिवारात आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास बिबट्या आढळून आला आहे. मात्र हा बिबटय़ा काही वेळातच बेशुध्द होऊन मृत्यूमुखी पडला. या परिसरात यापुर्वी कधीच बिबटय़ा पाहण्यात आला नव्हता. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून बिबटय़ाच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन झाल्यानंतर समोर येणार आहे.

धाराशिव शहरापासून सात ते आठ किलोमिटरवर असलेला घाटंग्री शिवार डोंगराळ भाग आहे. धाराशिव लेणी, हातलादेवी या ठिकाणचा हा परिसर जंगलाचा भाग आहे. आज शनिवारी सकाळी सहाच्या दरम्यान शिवारात बिबट्याने डरकाळी फोडली. त्यानंतर नागरिकांचे त्याच्याकडे लक्ष गेले. एका झाडाखाली बसलेला हा बिबट्या काही वेळातच बेशुद्ध झाला. कुत्र्यांनी त्याला चावा घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने काहीच हालचार केली नाही. त्यानंतर नागरिकांची गर्दी वाढत गेली. नागरिकांनी वन विभागाच्या अधिकाऱयांना ही माहिती दिली. त्यानंतर वनविभागाचे पथक दाखल झाले. त्यांनी तपासले असता बिबट्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. पथकाने पंचनामा केला असून पशुवैद्यकीय दवाखान्यात शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या