
धाराशीव येथे नवीन वैद्यकीय महाविद्यालय तसेच 430 खाटांचे रुग्णालय सुरु करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी एकूण रुपये 674.14 कोटी (अनावर्ती खर्च सुमारे रूपये 429.63 कोटी व आवर्ती खर्च सुमारे रूपये 244.51 कोटी) इतका निधी उपलब्ध करून देण्यात येईल. महाविद्यालयासाठी आवश्यक तेवढी पदनिर्मिती करण्यास आणि पदे भरण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे.
नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकरिता राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकांप्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारितील जिल्हा सामान्य रुग्णालय, स्त्री रुग्णालय आणि क्षय रुग्णालय तात्पुरत्या स्वरूपात वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागास निशुल्क वापरास उपलब्ध करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय सार्वजनिक खाजगी भागिदारी तत्वावर सुरू करण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे.
बालकांच्या पोषण आहार अनुदानात 8 टक्क्यांनी वाढ
महागाई लक्षात घेऊन बालगृहे, निरीक्षण गृहे, खुले निवारागृहे, आणि विशेष दत्तक संस्था यामधील प्रत्येक बालकांसाठी प्रतिमहा 2 हजार रुपये याप्रमाणे लागू असणार्या परिपोषण अनुदानाच्या दरात वार्षिक 8 टक्के वाढ करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. ही वाढ 2021-22 या आर्थिक वर्षापासून लागू करण्यात येणार आहे. बाल कल्याण समितीच्या बैठका दरमहा 12 वरून 20 करण्यास तसेच या समितीच्या व बाल न्याय मंडळाच्या बैठक व प्रवास भत्यामध्ये 1 हजार रुपयांवरून 1500 रुपये इतकी वाढ करण्यास देखील आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

























































