
सामना प्रतिनिधी । बुलढाणा
शेतकर्यांचे तूर, हरभर्याचे नाफेडकडे असलेले चुकारे दिवाळीपूर्वी देण्याबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज राज्याचे मुख्य सचिव यांच्यासोबत बैठक घेऊन मागणी केली असता येत्या आठ दिवसात दिवाळीपूर्वी तूर हरभर्याचे थकीत चुकारे करु, असे आश्वासन यावेळी शासनातर्फे राज्याच्या मुख्य सचिवाने दिले.
यावर्षी शासनाने, हमी भावाने तूर व हरभरा खरेदी केली आहे. मात्र तुरीचे व हरभर्याचे चुकारे काही तांत्रिक अडचणीमुळे अदा करण्यात आले नव्हते. त्यामुळे शेतकरी अत्यंत आर्थिक अडचणीत आला होता. सदरहु चुकारे लवकरात लवकर अदा करण्यात यावे यासाठी शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ. शशिकांत खेडेकर व आमदार डॉ.संजय राममुलकर यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा केला त्यानुसार २१ सप्टेंबर रोजी मुंबई येथे कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांच्या दालनात संबंधित सर्व अधिकारी यांच्या सोबत बैठक झाली व त्याच दिवशी मुंबई येथे महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांच्या दालनामध्ये सुध्दा बैठक झाली व नंतर सर्व शासकीय यंत्रणा त्वरीत कार्यरत झाली. महाराष्ट्र शासनाने नाफेड, दिल्ली यांच्याशी संपर्क करुन सदरहु चुकारे देण्याची विनंती केली. आज २३ रोजी मुंबई येथे मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांच्या दालनात, खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ. शशिकांत खेडेकर व आमदार डॉ.संजय राममुलकर तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख जालिधंर बुधवत यांच्या सोबत बैठक झाली असता आठ दिवसाच्या आत सदरहु पिकाचे चुकारे शेतकर्याच्या खात्यामध्ये जमा होतील असे आश्वासन मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांनी बैठकीत दिले.






























































