पोक्सो प्रकरणातील आरोपीने रचला स्वत:च्या मृत्यूचा बनाव, न्यायालयाने दिली 7 वर्षांची शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिक्षेपासून वाचण्यासाठी एका आरोपीने स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचला होता. मात्र मुंबई पोलिसांनी त्याचा हा डाव हाणून पाडत त्याला पुन्हा अटक केली आणि न्यायालयासमोर हजर केलं. त्याच्या या कृत्यामुळे न्यायालयाने या आरोपीला पोक्सो कायद्याअंतर्गत शिक्षा 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.  हा आरोपी 32 वर्षांचा असून तो स्वत:चा मृत्यू झाल्याचं सांगत मोकाट फिरत होता.  न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेमुळे त्याला जरब बसेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

2015 साली केला होता चिमुरडीवर अत्याचार

7 एप्रिल 2015 रोजी या आरोपीने विकृत कृत्य केलं होतं. शेजारी राहणाऱ्या तीन वर्षांच्या मुलीला त्याने घरी नेऊन लैंगिक अत्याचार केला होता.  मुलीच्या आईला ती परिसरात खेळताना न दिसल्याने तिने मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केली.  शोधाशोध सुरू असताना तिने एका बंद दाराची कडी ठोठावली.  यावेळी आरोपीने घराचे दार उघडले आणि मुलीच्या आईला मुलगी त्याच घरात रडताना सापडली होती. महिलेने आरडाओरडा करत स्थानिकांच्या मदतीने आरोपीला पकडलं होतं. स्थानिकांनी नंतर आरोपीला पोलिसांच्या हवाली केलं होतं.

गावी जात असल्याचे सांगून आरोपी फरार

आरोपी ऑगस्ट 2015 मध्ये जामिनावर सुटला होता. तेव्हापासून एप्रिल 2018 पर्यंत तो न्यायायलात खटल्याच्या सुनावणीकरिता नियमितपणे हजर राहात होता. त्यानंतर त्याने अचानकपणे कोर्टात येणे बंद केले.  पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की आरोपी हा त्याच्या वडिलांचे निधन झाल्याचे सांगून उत्तर प्रदेशला गेला होता. त्यानंतर तो फरार झाला होता.  आरोपी फरार झाल्याने न्यायालयाने त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.  नोव्हेंबर 2018 मध्ये एक व्यक्ती न्यायालयात आली आणि तिने आपण आरोपीचा भाऊ असल्याचे सांगितले. या व्यक्तीने आपल्या भावाचे निधन झाले असल्याचे सांगत आरोपीचे बनावट मृत्यू प्रमाणपत्र न्यायालयात सादर केले.

गावच्या घरी आरोपी सापडला

आरोपीचा मृत्यू झाला असेल तर मग खटला पुढे चालू शकणार नसल्याने आरोपीच्या मृत्यूबाबतची खरी परिस्थिती सादर करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारी वकिलांना दिले होते. सरकारी वकिलांनी ही बाब वरळी पोलिसांना कळवली होती आणि आरोपी खरोखर मेला आहे का याची खातरजमा करण्यास सांगितले.  पोलीस जेव्हा आरोपीच्या गावच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांना आरोपी जिवंत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली आणि न्यायालयात हजर केले.

2019 साली न्यायालयाने पोलिसांना आरोपीने दाखल केलेल्या बनावट मृत्यू प्रमाणपत्र प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते.  विशेष सरकारी वकील गीता शर्मा यांनी आरोपीविरोधात फसवणूक आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी नव्याने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.  न्यायालयाने पोक्सो प्रकरणी पीडित मुलगी, तिची आई आणि इतर साक्षीपुराव्यांच्या आधारे आरोपीला दोषी ठरवले होते. मंगळवारी या आरोपीला 7 वर्षांची सुनावत असल्याचे न्यायालयाने आदेशात म्हटले होते.