पैशांचा पाऊस भाग २८- आर्थिक नियोजनाचे महत्त्व : विमा नियोजन

24

mahesh-chavan-th

>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर मार्केट तज्ज्ञ)

गेल्या वर्षी घडलेल्या दोन घटना. एक घटना माझ्या एका दूरच्या नातेवाईकांच्या बाबतीत घडली. गणेश चे वयाच्या ३६ व्या वर्षी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. मागे पत्नी, २ मुले, आई- वडील असा परिवार. असे काही जवळच्या परिवारात घडले की माझी चक्र आता या परिवाराची आर्थिक परिस्थिती काय? याकडे पुरेसा विमा आहे काय? असेल तर त्याची काही रक्कम मिळेल का? किंवा नसेल तर हा परिवार काय करेल ?असे एक ना अनेक प्रश्न डोक्यात येऊ लागतात. नंतर जवळच्या काही नातेवाईक कडे चौकशी केल्यावर लक्षात आले त्यांची आर्थिक परिस्थिती मध्यम वर्गीयांमध्ये मोडणारी. मयत व्यक्तीने स्वतः साठी २-३ विमा पॉलिसी घेतल्या होत्या त्याचे ४ लाख मिळाले, हे कळाले..

दुसरी घटना माझ्या इमारतीत राहणाऱ्या किशोर नावाच्या मित्रासोबत घडली. याचेही वय ४० च्या आसपास. दोन मुली आणि पत्नी असा परिवार. किशोर मित्रांसोबत पिकनिकला गेला असताना, कार अपघातात किशोर आणि याचे २ ऑफिसमधील सहकारी जागेवरच गेले. त्याच्या पत्नीसाठी हा धक्का तर मोठा होताच पण त्याच बरोबर दोन मुली ना सांभाळणे आणि पुढील भविष्य यांचा विचार त्यांच्या समोर होता. पण जेव्हा कळले की या मित्राने स्वतःचा १ कोटी रुपयांचा जीवन विमा काढला होता. त्यामुळे त्या गेलेल्या मित्राबद्ल सहानभूतीची जागा आज सन्मानाने घेतली आहे. कारण घरातील कर्त्या व्यक्तीची हीच जबाबदारी असते परिवाराला आपण नसताना काय गरजेचे आहे ते ज्याला कळते तोच खरा जबाबदार कर्ता पुरुष होय.

वरील दोन घटनांमध्ये काय दिसून येते तर दोघांनीही जीवन विमा घेतला होता, पण आपल्या परिवाराला किती रकमेची गरज आहे, कोणती विमा पॉलिसी घ्यावी याबद्दल गणेशला काहीच माहीत नव्हते. त्याने ३ पॉलिसी काढल्या होत्या पण त्या सर्व गुंतवणुक प्लस सुरक्षा प्रकारातल्या होती त्यामुले त्याला विमा कव्हर फक्त ४ लाखाचा होता.तर त्याउलट किशोर ने १ जीवन विमा पॉलिसी घेतली होती ती निव्वळ सुरक्षा प्रकारातील होती त्यामध्ये जीवन विम्या चा हफ्ता कमी असतो पण जीवन विमा कव्हर मोठा असतो.

एखाद्या परिवाराची झालेली मनुष्यहानी कोणी भरून काढू शकत नाही पण आर्थिक हानी आपण विमा नियोजना द्वारे करू शकतो. जीवन विमा एक गुंतवणूक कि विमा संरक्षण हा मूळ प्रश्न आहे. आज हिंदुस्थानातील फक्त १८% लोकांकडे विमा संरक्षण आहे पण यातील किशोर सारखे विमाधारक किती असतील ? हा हि एक प्रश्न आहे. आज विविध गुंतवणुकीचे पर्याय आपल्याकडे असताना अजून हि हिंदुस्थानात विमा हा गुंतवणूक पर्याय म्हणून पहिला जातो जिथे फिक्स्ड डिपॉझिट पेक्षाही कमी परतावा मिळतो. आपल्या परिवाराची आर्थिक जबाबदारी आपल्यावर आहे आपण असताना हि आणि नसताना हि त्यामुळे स्वतःच्या उत्पन्ननुसार आणि भविष्यातील गरजेनुसार विमा नियोजन करणे काळाची गरज बनली आहे.

***विमा नियोजन कसे करावे?***
विमा नियोजन करताना खालील गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. त्यासाठी आपण खालील उदाहरण बघू

श्री. काळे वय ४० वर्ष एका नामांकित कंपनी मध्ये कामाला आहेत, त्यांच्या फॅमिली मध्ये पत्नी, एक मुलगा आणि आई वडील आहेत. घरासाठी घेतलेले कर्ज आज जवळपास १२ लाख पर्यंत शिल्लक आहेत. आणि त्याचबरोबर भविष्यात मुलाच्या शिक्षणासाठी, आई वडिलांच्या औषध पाण्यासाठी ५० लाखाची गरज आहे. श्री.काळे यांचे विमा नियोजन साठी कितीचा विमा घ्यावा लागेल ते आपण पाहूया.

१. सध्याचे वार्षिक उत्पन्न= ५ लाख
२. सध्या असलेली कर्जाची रक्कम = १२ लाख
३. भविष्यातील आर्थिक ध्येयासाठी लागणारी रक्कम = ५० लाख.

विमा नियोजनाचा पहिला मंत्र म्हणजे वार्षिक उत्पनाच्या २० पट विमा आपल्याकडे असायला हवा म्हणजे श्री. काळे यांना प्राथमिक स्वरूपात १ करोड चा विमा गरजेचा आहे. कारण अचानक मृत्यू ओढवाला तर विम्यातून मिळणाऱ्या १ करोड रक्कमेच्या गुंतवणुकीतून वार्षिक ७%-८% म्हणजे ७-८ लाख सहज मिळवू शकतात. ताचबरोबर काळे यांनी घेतलेलं कर्जे पण बँकला परत देणे आलेच आणि भविष्यातील आर्थिक ध्येयासाठी लागणारी रक्कम म्हणजे अजून एक ६२ लाख रुपयांची गरज आहे. या सर्व घटकांचा अभ्यास केल्यास श्री. काळे यांना जवळपास १.६२ लाख रुपयांचा विमा गरजेचा आहे. श्री.काळे यांना कमीत कामीं १.५० करोड चा टर्म इन्शुरन्स गरजेचा आहे ज्यासाठी जवळपास ४०००० चा त्यांना विम्याचा हफ्ता भरावा लागेल.

आर्थिक नियोजनाची सुरुवात करताना विमा नियोजन ही पहिली पायरी आहे. बहुतेक जण विमा म्हणजेच गुंतवणूक समजून गणेश ने जी चूक केली ती चूक करताना दिसतात. मनी बॅक पॉलिसी हा एक लोकप्रिय प्रकार आहे.पण ज्याप्रमाणे आपण आपल्या कारचा इन्शुरन्स घेतो आणि त्यातून कोणताही परतावा आपल्याला अपेक्षित नसते त्याचप्रमाणे स्वतःचा विमा घेतानाही त्याप्रमाणे विचार करणे गरजेचे आहे.
लक्षात घ्या, तुम्हाला किती रकमेचा विमा घ्यायचा हे वरील उदाहरणावरून तुम्ही काढू शकता आणि आपल्या परिवाराला एक जबरदस्त सुरक्षा कवच देऊ शकता.

आपली प्रतिक्रिया द्या