पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना निवडणुकीच्या शर्यतीत आणण्यासाठी रात्री 10 वाजता मतमोजणी तब्बल आठ तास बंद करून नवाज शरीफ यांना विजेत्यांच्या शर्यतीत आणले गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावेळी लष्कराच्या माध्यमातून रातोरात मतपेटय़ा बदलल्या गेल्या. यानंतर शरीफ शर्यतीत आले. हिंदुस्थानात सध्या सुरू असलेल्या एकाधिकारशाहीच्या राजकारणामुळे असाच प्रकार घडू शकतो, अशी भीती सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे.
पाकिस्तानात गुरुवारी रात्री 10 वाजेपर्यंत मतपेटय़ांतून माजी पंतप्रधान इम्रान खान समर्थकांच्या एकतर्फी विजयाचे निकाल यायला लागले होते. हे पाहून पाक लष्कर व नवाज शरीफ कंपूमध्ये घबराट पसरली. नवाज शरीफ स्वतः लाहोरमध्ये इम्रान समर्थक उमेदवारांपेक्षा पिछाडीवर दिसले. हीच स्थिती त्यांच्या पक्षाच्या बहुतांश नेत्यांची होती. इस्लामाबादमध्ये पीएमएलएनच्या कार्यालयात टीव्हीवर निवडणूक कल पाहून नवाज शरीफ व त्यांची मुलगी मरियम घरी निघून गेले. यानंतर लष्कराने निवडणूक आयोगाची कमान सांभाळली. नवाज यांचे छोटे बंधू माजी पीएम शाहबाज शरीफही लष्कर मुख्यालयात पोहोचले. मुख्य निवडणूक आयुक्त सिकंदर सुलतान यांना रात्री 11 वाजता एक कॉल आला व तेदेखील आयएसआयचे ब्रिगेडियर नासिर यांच्याकडे लष्कर मुख्यालयात पोहोचले. लष्कराचे आदेश घेऊन निवडणूक आयुक्त पुन्हा कार्यालयात आले व 8 तास मतमोजणी थांबवली. तिकडे लष्कर मुख्यालयातील बैठकीत नवाज यांना लाहोरमधून जिंकवण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर शाहबाज निघून गेले. या दोन मोठय़ा गुप्त बैठकांनी डाव उलटला. 8 तासांत मतपत्रिका बदलल्या. सकाळी 7 वाजेपर्यंत शरीफ व त्यांचा पक्ष शर्यतीत आला.
सत्ता स्थापनेवरून दावे-प्रतिदावे
पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्ता स्थापनेवरून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. यात माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पार्टीचा पाठिंबा असलेल्या 99 अपक्ष उमेदवारांचा विजय झाला आहे. तर पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) पक्षाला 73 जागा मिळाल्या आहेत. पाकिस्तान पीपुल्स पार्टी (पीपीपी) ने 53 जागा जिंकल्या आहेत. मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट (एमक्यूएम) ला 17 जागा मिळाल्या असून अन्य जागा छोटय़ा पक्षाला मिळाल्या आहेत. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) आणि पाकिस्तान पीपुल्स पार्टी (पीपीपी) ने केंद्र आणि पंजाबमध्ये आघाडीचे सरकार करण्यावर सहमती दर्शवली आहे.