
पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अमेरिकेत जाऊन हिंदुस्थानला धमकी दिली आहे. ‘हिंदुस्थानविरुद्धच्या युद्धात पाकिस्तानच्या अस्तित्वावर संकट आल्यास संपूर्ण आशिया खंडाला अणुयुद्धात ओढू. आम्ही बुडणार असे वाटले तर अर्ध्या जगाला घेऊन बुडू,’ असे तारे मुनीर यांनी तोडले आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘व्हाइट हाऊस’मध्ये डिनर दिल्यापासून मुनीर प्रकाशझोतात आले आहेत. त्यांच्या अमेरिकेतील फेऱया वाढल्या आहेत. अमेरिकेतील टाम्पा शहरात एका उद्योगपतीने दिलेल्या डिनर पार्टीत मुनीर नुकतेच सहभागी झाले होते. या पार्टीतील पाहुण्यांना मोबाइल किंवा अन्य डिजिटल साधने सोबत ठेवण्याची परवानगी नव्हती. याच पार्टीत मुनीर यांनी हिंदुस्थान विरोधात गरळ ओकली. ‘द प्रिंट’ने या संदर्भातील वृत्त दिले आहे.
ते धरण मिसाईलने उडवू!
सिंधू जलवाटप कराराला स्थगिती देण्याच्या हिंदुस्थानच्या निर्णयावर मुनीर यांनी संताप व्यक्त केला. या निर्णयामुळे 25 कोटी लोकांची उपासमार होऊ शकते. सिंधू नदीचे पाणी ही हिंदुस्थानची कौटुंबिक मालमत्ता नाही. हिंदुस्थान धरण बांधण्याची आम्ही वाट पाहत आहोत. आमच्याकडे मिसाइलची कमी नाही. त्यांनी धरण बांधल्यास 10 मिसाइल डागून ते उद्ध्वस्त करून टाकू, असे मुनीर म्हणाले.