
भारतीय जनता पक्षाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्याबाबत केलेल्या विधानाचा वाद अद्यापही शमलेला नाही. देशभरातून त्यांना हत्या आणि बलात्काराच्या धमक्याही मिळत आहेत. तसेच त्यांचे मुंडके धडावेगळे करणाऱ्याला बक्षिसही जाहीर होत आहेत. आता देशाबाहेर पाकिस्तानमध्येही त्यांच्या हत्येचा कट शिजत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राजस्थान पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे.
राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे हिंदुस्थान-पाक सीमेवर एका घुसखोराला पोलिसांनी अटक केली होती. अटक केलेल्या व्यक्तीचे नाव अशरफ रिझवान असून तो पाकिस्तानच्या पंजाबमधील मंडी बहाउद्दीने येथील रहिवासी आहे. अशरफ हिंदुमलकोट सेक्टरमध्ये असलेल्या खाखान चेकपोस्टवरून हिंदुस्थानात घुसण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.
‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. इंटेलिजन्स विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक एस. सेंगाथीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधील कट्टरपंथी संघटना ‘तहरीक-ए-लब्बैक’ने नुपूर शर्मा यांच्या हत्येचा कट रचला आहे. राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे हिंदुस्थान-पाक सीमेवर अटक करण्यात आलेला अशरफ रिझवान या संघटनेचा सदस्य आहे. खाखान चेकपोस्टवरून हिंदुस्थानात घुसण्याचा त्याचा प्रयत्न होता. मात्र हा डाव उधळण्यात आला.
आयबी, सीआयडी, बीएसएफ, लष्कर आणि स्थानिक पोलिसांसह अनेक तपासयंत्रणा सध्या रिझवानची चौकशी करत आहेत. तो ‘तहरीक-ए-लब्बैक’ या संघटनेच्या संपर्कात असल्याचे उघड झाल्यानंतर तपासयंत्रणा सतर्क झाल्या आहेत. विशेष म्हणजे याच संघटनेने गेल्या वर्षी पाकिस्तानमधील तत्कालिन इम्रान खान सरकारला घेरण्याचे काम केले होते आणि अनेक हत्याही केल्या होत्या.
दरम्यान, बीएसएफच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, 16 जुलैच्या रात्री 11 च्या सुमारास हिंदुमलकोट सेक्टरमध्ये असलेल्या खाखान चेकपोस्टजवळ अशरफ रिझवान याला पकडण्यात आले होते. गस्त घालणाऱ्यांना तो संशयास्पद स्थितीत आढळला होता. त्यानंतर त्याला ताबम्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 11 इंचांचा चाकू, धार्मिक पुस्तके, कपडे अशा गोष्टी जप्त करण्यात आल्या होत्या.





























































