
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या (वन डे व टी-20) इतिहासात हिंदुस्थानची पाकिस्तानविरुद्धच्या विजयाची परंपरा अखेर 30 वर्षांनंतर खंडित झाली. पाकिस्तानने सलामीच्या लढतीत विराट कोहलीच्या सेनेचा 10 गडी आणि 13 चेंडू राखून धुव्वा उडवित टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवीला. कर्णधार बाबर अझम आणि मोहम्मद रिझवान यांची अर्धशतके ही या विजयाची प्रमुख्य वैशिष्टय़े ठरली. हिंदुस्थानची आघाडीची फळी कापून काढणारा वेगवान गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदी या सामन्याचा मानकरी ठरला.
बाबर-रिझवानचे वर्चस्व
हिंदुस्थानकडून मिळालेले 152 धावांचे लक्ष्य पाकिस्तानने एकही फलंदाज न गमावता 17.5 षटकांत पूर्ण केले. बाबर अझम आणि मोहम्मद रिझवान यांनी पहिल्या षटकापासून हिंदुस्थानी गोलंदाजांवर वर्चस्व गाजविले. भुवनेश्वर कुमार व मोहम्मद शमी यांनी पहिल्या स्पेलमध्ये घोर निराशा केली. जसप्रीत बुमराहने टिच्चून मारा केला, पण त्याला बळी टिपता आले नाहीत. वरुण चक्रवर्ती आणि रवींद्र जाडेजा ही फिरकीची जोडगोळीही अपयशी ठरली. मोहम्मद शमीच्या 18व्या षटकात रिझवानने पहिल्या तीन चेंडूवर षटकार, चौकार आणि चौकार ठोकून सामन्यातील हवा काढून घेतली. त्यानंतर पाचव्या बाबरने 2 धावा काढत विजयाची औपचारिकता पूर्ण केली.
टी-20 विश्वचषक स्पर्धेतही हिंदुस्थानने याआधीच्या पाचही लढतीत पाकिस्तानला धूळ चारलेली आहे. आजचा दिवस बाबरच्या पाकिस्तानचा होता. त्यांनी अखेर विश्वचषक स्पर्धेत हिंदुस्थानला हरवून आपले स्वप्न सत्यात उतरवले.
विराट-पंत जोडीचा प्रतिकार
हिंदुस्थानची 2.1 षटकांत 2 बाद 6 अशी दुर्दशा झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव खेळपट्टीवर आले. सूर्यकुमारने 8 चेंडूंत एक षटकार व एका चौकारासह 11 धावा केल्या. हसन अलीने त्याला यष्टीमागे रिझवानकरवी झेलबाद करून पाकिस्तानला तिसरे यश मिळवून दिले. त्यानंतर आलेल्या रिषभ पंतने कोहलीला चांगली साथ दिली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 83 धावांची भागीदारी केली. पंतने 30 चेंडूंत 39 धावांची खेळी करताना 2 उत्तुंग षटकार व तितकेच सणसणीत चौकार लगावले. शाबाद खानने स्वतःच्या गोलंदाजीवर झेल टिपत पंतची खेळी संपुष्टात आणली. त्याच्या जागेवर आलेल्या रवींद्र जाडेजाला मोठी खेळी करण्यात अपयश आले. 13 चेंडूंत 13 धावा काढून तो हसन अलीच्या गोलंदाजीवर बदली क्षेत्ररक्षक मोहम्मद नवाझकरवी झेलबाद झाला. पहिल स्पेल गाजविणारा शाहिन शाह आफ्रिदी 19व्या षटकात आपले अखेरचे षटक घेऊन आला. त्याने पाकिस्तानला अर्धशतकी खेळी करणाऱया विराट कोहलीचा बहुमोल बळी मिळवून दिला. कोहलीने 49 चेंडूंत 57 धावांची खेळी करताना एका षटकारासह पाच चेंडू सीमापार पाठविले.




























































