
सामना ऑनलाईन । चंदीगढ
दहशतवादाच्या मुद्द्यावर जगभरातून चपराक बसल्यानंतरही पाकिस्तानच्या कुरापती अजूनही सुरूच आहेत. पंजाबच्या तरणतारणमधील खेमकरण सेक्टरमध्ये पाकिस्तानी ड्रोनने घुसखोरी केली आहे. पाकिस्तानी ड्रोन दिसताच सुरक्षा दलाच्या जवानांनी गोळीबार करून ते पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ड्रोन पाडल्याच्या वृत्ताला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. या परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
याआधीही पाकिस्तानच्या ड्रोनने हिंदुस्थानच्या हद्दीत घुसखोरी केली आहे. घुसखोरी करणारे पाकिस्तानचे ड्रोन हिंदुस्थानच्या लष्कराने कारवाई करून पाडले आहेत. मात्र, पाकिस्तानकडून अजूनही कुरापती सुरूच आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरही पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबाराच्या घटना घडत आहेत. हिंदुस्थानच्या सुरक्षा दलाकडून त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी पंजाबच्या सीमाभागात पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी घुसखोरी केली होती. हिंदुस्थानच्या सुरक्षा चौक्यांचा आढावा घेण्यासाठी ही विमाने हिंदुस्थानच्या क्षेत्रात घुसली होती. त्यानंतर आता पाकिस्तानच्या ड्रोनने घुसखोरी केल्याने दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी पाकिस्तान टेहळणी करत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे सुरक्षा दलाला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.


























































