पाकिस्तानात पुराचा कहर, मोहम्मद धरण फुटल्याने अनेक प्रांतात महापूर, 1 हजार जणांचा मृत्यू, आणीबाणी घोषित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानात आलेल्या महापुराने कहर केला असून देशातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पुरामुळे आता पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामध्ये बांधण्यात येत असलेले मोहम्मद धरण फुटले असून, त्यामुळे पाकिस्तानातील अनेक राज्यांमध्ये मोठा विध्वंस होण्याची शक्यता आहे. या भीषण पुरामुळे आतापर्यंत एक हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर तीन कोटींहून अधिक नागरिक बेघर झाले आहेत. यामुळे आता पाकिस्तानात राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.

पाकिस्तानातील भयानक नैसर्गिक आपत्तीमुळे निम्मा पाकिस्तान पुरात बुडाला आहे. बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वाने तिथे एकाच दिवसात प्रचंड विध्वंस झाला आहे. पाकिस्तानमध्ये जूनपासून आलेल्या पुरामुळे 1 हजार हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानात यंदा सरासरीपेक्षा 500 ते 700 टक्के जास्त पाऊस झाला आहे. सरकार याला हवामान-प्रेरित आपत्ती म्हणत आहे.

अनेक जण घराच्या छतावर बसून त्यांना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टर पाठवण्याची विनंती अधिकाऱ्यांना करत आहेत. यापैकी अनेकांना वेळेत मदत न मिळाल्यामुळे त्यांचा यात मृत्यू झाला आहे. याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने लोकांकडून पाकिस्तान सरकारवर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. पुरामुळे घरे, उभी पिके, रस्ते आणि पूल सर्व काही उद्ध्वस्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत पाकिस्तानात 34 जणांचा मृत्यू झाला आहे.

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री महमूद खान यांनी पूरग्रस्तांच्या सोयीसाठी सर्व सरकारी इमारती उघडण्याची घोषणा केली आहे. प्रांतीय उच्च शिक्षण मंत्री कामरान खान बंगश यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूरग्रस्त भागातील महाविद्यालये, ग्रंथालये आणि सर्व उच्च शिक्षण कार्यालये पीडितांसाठी उघडण्यात आली आहेत. येथे पावसाची आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था, संघटना आणि देशांना मदतीचे आवाहन केले आहे. डॉन वृत्तपत्राच्या अहवालानुसार, सर्वाधिक सिंध आणि बलुचिस्तानमध्ये या पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. येथे अनुक्रमे 784 टक्के आणि 496 टक्के पाऊस झाला आहे. सिंध प्रांतातील 23 जिल्हे आपत्तीग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहेत.