मसूद अझरचा निकटवर्ती दाऊद मलिकची गोळ्या घालून हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या आणि हिंदुस्थानच्या संसद आणि पुलवामा हल्ल्यासह अनेक दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार मसूद अझर याचा निकटवर्तीय दाऊद मलिक याची पाकिस्‍तानमधील वझिरीस्तान शहरात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दाऊद मलिक हा लष्कर-ए-जब्बार या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या होता. तो जगातील मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांपैकी एक होता.

पाकिस्तानमधील उत्तर वझिरीस्तानमधील मिराली भागात असलेल्या एका खाजगी दवाखान्यात उपचार घेण्यासाठी दाऊद जात असताना त्याच्यावर हा हल्ला झाला. काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात तो जागीच ठार झाला. त्याचा मृत्यू हा मसूद अझर साठी मोठा धक्का मानला जातो.

काही दिवसांपूर्वी हिंदुस्थानने मोस्ट वाँटेड म्हणून घोषित केलेल्या शाहीद लतीफ या दहशतवाद्याची हत्या करण्यात आली होती. हा दहशतवादी पठाणकोट इथे झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार होता. सियालकोटमध्ये ही हत्या करण्यात आलेली. 1 जानेवारी 2016 रोजी हिंदुस्थानी सैनिकांच्या वेषात आलेल्या दहशतवाद्यांनी पठाणकोट हवाईतळावर हल्ला केला होता. या हल्ल्यात 7 जवान शहीद झाले होते. जैश ए मोहम्मदचा मौलाना मसूद अजहर याने हल्ल्याचा कट रचला होता आणि तो पूर्ण करण्याची जबाबदारी शाहीद लतीफवर सोपवण्यात आली होती.