
पाकिस्तानने कोरोना संकटात आपली एक कोरोना प्रतिबंधक लस लॉन्च केली आहे. या लसीचे नाव PakVac Covid-19 Vaccine ठेवण्यात आले आहे. असे असले तरी ही लस किती प्रभावी आहे, या लसीमुळे कोरोना आटोक्यात आणण्यात किती फायदेशीर आहे याबाबत कुठलीच माहिती देण्यात आलेली नाही. यापूर्वी पाकिस्तानने चीन आणि रशियाकडून लस विकत घेतल्या होत्या.
पाकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाचे विशेष सहाय्यक डॉ फैसल सुलतान आणि नॅशल कमांड अँड ऑपरेशन सेंटरचे प्रमुख असद उमर यांनी ही लस लॉन्च केली. तसेच देशात लवकरच या लसीचे उत्पादन सुरू होईल अशी माहिती दिली.
डॉ. फैसल सुलतान म्हणाले की, प्रत्येक संकटात एक संधी असते. कोरोना संकटात चीनने पाकिस्तानाचा मित्र राष्ट्र म्हणून खूप मदत केली आहे. जेव्हा पासून कोरोनाचे संकट आले आहे तेव्हापासून चीनने मदत केल्याचे सुलतान यांनी सांगितले.
चीनच्या मदतीने ही लस विकसित केल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. असे असले तरी ही लस किती प्रभावी आहे आणि या लसीमुळे कोरोना किती आटोक्यात येईल याबाबत पाकिस्तानने काहीही सांगितले नाही.





























































