
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
इम्रान खान यांनी पंतप्रधानपदाची इनिंग सुरू केल्यानंतर हिंदुस्थानच्या दिशेने पहिलाच बॉल टाकला खरा; पण तो ‘नो बॉल’ निघाला आहे. हिंदुस्थानकडून चर्चेचा प्रस्ताव आल्याचा दावा पाकचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी केला; पण असा प्रस्ताव हिंदुस्थानने पाठविला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून वावडय़ा उठविल्या जात असल्याचे पुढे आले आहे.
इम्रान खान यांनी दोन दिवसांपूर्वी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इम्रान खान यांचे अभिनंदन करणारे पत्र पाठविले आहे. या पत्राचा विपर्यास करून पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी हिंदुस्थानने चर्चेचा प्रस्ताव ठेवल्याचे जाहीर केले. पाकिस्तानी मीडियाने कुरेशी यांचे वक्तव्य ठळक प्रसिद्ध केले. जिओ टीव्हीने कुरेशी यांच्या हवाल्याने पंतप्रधान मोदी यांच्या पत्रातील संकेतानुसार दोन्ही देशांमध्ये पुन्हा चर्चा सुरू होईल, असे म्हटले. यावर चर्चेचा प्रस्ताव पाठविला नाही. अभिनंदनाचे पत्र पाठविल्याचे सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले आहे. दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही, अशी हिंदुस्थानची भूमिका असल्याचे सरकारी सूत्रांनी म्हटले आहे.
पाकचे परराष्ट्र खाते म्हणते…मोदींच्या पत्रात अशीच काहीशी इच्छा
पाकिस्तानने या प्रकरणावरून रात्री उशिरा ‘यूटर्न’ घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाठविलेल्या पत्रात कश्मीर प्रश्नावर चर्चेची मागणी केल्याचे आमच्या परराष्ट्र मंत्र्यांनी कधीही म्हटलेले नाही. मात्र, मोदींच्या पत्रात अशीच काहीशी इच्छा व्यक्त केली होती, असे पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. दरम्यान, सध्या तुरुंगवास भोगणारे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची कन्या मरीयम यांना देशाबाहेर जाण्यास मनाई करण्याचा निर्णय इम्रान खान सरकारने घेतला आहे.
मोदींच्या पत्रात काय आहे?
पंतप्रधान मोदी यांनी इम्रान खान यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘पाकिस्तानसोबत शांततापूर्ण शेजारी संबंधांसाठी हिंदुस्थान कटिबद्ध आहे. विधायक संबंधांसाठी प्रतिबद्ध आहोत. सकारात्मक आणि आर्थिक भागीदारीसाठी आशावादी आहे. दहशतवादमुक्त दक्षिण आशियासाठी दोन्ही देशांनी काम करायला हवे.’


























































