पाकिस्तानची हवाई हद्द हिंदुस्थानसाठी खुली

74

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानी विमानांना आपल्या हवाई हद्दीतून जाण्यास केलेली बंदी पाकिस्तानने तब्बल 139 दिवसांनी सोमवारी रात्री पाऊण वाजता मागे घेतली. यामुळे आता दोन्ही देशांची विमाने एकमेकांच्या हवाई हद्दीतून बेरोकटोक जाऊ शकणार आहेत. बालाकोट एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानने आपली हवाई हद्द बंद केली होती. गेल्या महिन्यात पाकिस्तानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आपली हवाई हद्द 48 तासांसाठी खुली केली होती, मात्र मोदी यांनी त्यांची हवाई हद्द वापरली नव्हती.

पुलवामा हल्ल्यानंतर हिंदुस्थानी जवानांनी 26 फेब्रुवारीला पाकच्या बालाकोट येथे एअर स्ट्राइक करत कुख्यात ‘जैश-ए-मोहम्मद’ची शिबिरे उद्ध्वस्त केली होती. त्याच्या दुसऱयाच दिवशी पाकिस्तानी विमानांनी कश्मीरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यालाही हिंदुस्थानी विमानांनी रोखले. तेव्हापासूनच पाकिस्तानने हिंदुस्थानी विमानांना आपल्या हवाई हद्दीतून जाण्यास बंदी घातली होती. पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या डबघाईला आली आहे. गेल्या पाच महिन्यांत पाकिस्तानला पाच अब्जांचे नुकसान झाले आहे. त्यातच हवाई हद्द बंद ठेवून त्यांना आणखी नुकसान करून घ्यायचे नव्हते.

दोन्ही देशांचे अतोनात नुकसान
पाकिस्तानच्या या बंदीमुळे हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे मोठे नुकसान होत होते. एकीकडे खुद्द पाकिस्तानला या बंदीमुळे 688 कोटींचे नुकसान झाले, तर एअर इंडियालाही या बंदीमुळे 491 कोटींचा फटका बसला. इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन संस्थेच्या आकडेवारीनुसार दररोज एअर इंडियाच्या 233 विमानांचे जवळपास 70 हजार प्रवासी त्रासले होते. त्यांना आपल्या गंतव्य स्थानी दीड ते दोन तास उशीर होत होता.

आपली प्रतिक्रिया द्या