हिंदुस्थानसोबत आता चर्चा नाही! इम्रान खान यांची अणूयुद्धाची धमकी

2792

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आता हिंदुस्थानसोबत आम्ही चर्चेचा आग्रह धरणार नाही असे म्हटले आहे. तसेच खायचे वांदे झालेल्या इम्रान यांनी पुन्हा एकदा अणूयुद्धाची धमकी दिली आहे. प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याचा पुनरुल्लेख केला आहे. जम्मू-कश्मीरमधून कलम 370 हटवल्यापासून पाकिस्तानची आगपाखड सुरू असून इम्रान खान सातत्याने युद्धाची धमकी देत आहे.

अमेरिक वृत्तपत्र ‘द न्यू यॉर्क टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये इम्रान खान म्हणाले की, ‘आता त्यांच्यासोबत (हिंदुस्थान) चर्चा करण्याचा काहीही फायदा नाही. मी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, परंतु पंतप्रधान मोदींनी याकडे दुर्लक्ष केले. दुर्भाग्याची गोष्ट म्हणजे मी जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा शांततेसाठी आणि चर्चेसाठी केलेले प्रयत्नांना त्यांनी तुष्टीकरण म्हणून पाहिले.’ तसेच यापेक्षा अधिक आम्ही काही करू शकत नसल्याचेही ते म्हणाले.

मोदींवर हल्लाबोल
इम्रान खान यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी हिंदूत्ववादी असून कश्मीरमधून मुस्लीम नागरिकांना हाकलून लावून त्याला हिंदू बहूल बनवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा तथ्यहिन आरोप इम्रान यांनी केला. तसेच हिंदुस्थान कश्मीरमध्ये खोटी चकमक घडवून आणू शकतो आणि यानंतर पाकिस्तानवर सैन्य कारवाई करू शकतो अशी भितीही त्यांनी व्यक्त केली.

पाकिस्तान युद्धासाठी तयार
हिंदुस्थानने कारवाई केल्यास पाकिस्तान युद्धासाठी तयार असल्याची दर्पोक्तीही इम्रान यांनी पुन्हा केली. दोन अण्वस्त्रधारी देश आमने-सामने आल्यास काहीही होऊ शकते असे ते म्हणाले. कश्मीर मुद्द्याववरून तणाव वाढू शकतो. दोन अण्वस्त्रधारी देश समोरासमोर उभे ठाकल्या काहीही होऊ शकते, त्यामुळे जगभरातील देशांनी याकडे लक्ष देऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवावे असे आवाहनही त्यांनी केले.

हिंदुस्थानने आरोप फेटाळले
इम्रान खान यांच्या अणूयुद्धाच्या धमकीवर टीका करताना अमेरिकेतील हिंदुस्थानी राजदूत हर्षवर्धन श्रुंगला यांनी सर्व आरोप फेटाळले. आम्ही जेव्हा जेव्हा शांततेसाठी एक पाऊल उचलले तेव्हा तेव्हा आम्हाला धोका देण्यात आला. आम्ही दहशतवादावर पाकिस्तानकडून ठोस आणि कठोर कारवाई करण्याची आशा ठेवून असल्याचेही ते म्हणाले.

कश्मीरमधील परिस्थिती सामान्य
जम्मू-कश्मीरमधील परिस्थिती सामान्य आहे. परिस्थिती पाहून हळूहळू बंदी हटवण्यात येत आहे. शाळा, बंका आणि रुग्णालय सुरू करण्यात आले आहेत. तसेच अन्नधान्याचीही टंचाई नाही. नागरिकांच्या सुरक्षेसाठी संचारबंदी लागू करण्यात आली होती, असेही राजदूत हर्षवर्धन श्रुंगला म्हणाले आणि पाकिस्तानचे आरोप फेटाळले.

आपली प्रतिक्रिया द्या