पाकडे चेकाळले; काहीही संबंध नसताना हिंदुस्थान-कॅनडा वादात घेतली उडी…

दहशतवाद्यांचे सुरक्षित आश्रयस्थान अशी ओळख असणाऱ्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की होत आहे. असे असतानाही हिंदुस्थान- कॅनडामध्ये वाद सुरू झाल्याने पाकड्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत आहे. त्यामुळे काहीही संबंध नसताना पाकिस्तानने या वादात उडी घेत प्रतिक्रिया दिली आहे. तसेच हिंदुस्थानविरोधी प्रचार करण्याचा जुनाच कांगावा त्यांनी पुन्हा सुरू केला आहे.

दहशतवाद्यांना संरक्षण आणि आर्थिंक मदत करत असल्याने पाकिस्तानची जगभरात बदनामी झाली आहे. तरीही पाकडे सुधारत नसून आता हिंदुस्थान कॅनडामध्ये वादाची ठिणगी पडल्याने हिंदुस्थानकडे बोट दाखवण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमागे हिंदुस्थानचा हात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. कॅनडाच्या या आरोपांनी आम्हाला काहीही आश्चर्य वाटलेले नाही. त्यांनी केलेल्या आरोपात सत्यता आणि तथ्य असणार, असे पाकिस्तानचे पराराष्ट्र सचिव सायरस काजी यांनी म्हटले आहे. ते 78 व्या संयुक्त महासभेत सहभागी होण्यासाठी अमेरिका दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी हिंदुस्थानविरोधात गरळ ओकली आहे.

कॅनडात हिंदुस्थानचा दहशतवाद हे आमच्यासाठी आश्चर्यकारक नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. पाकिस्तानने 2016 मध्ये बलुचिस्तानमधून रॉच्या एका अधिकाऱ्याला कुलभूषण यादवला अटक केली आहे. त्यांच्यावर हेरगिरी केल्याचा आणि पाकिस्तानात दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या घटनेचा उल्लेख करत त्यांनी ट्रूडो यांच्या आरोपात तथ्य असल्याचे म्हटले आहे. हिंदुस्थानच्या अशा कारवायांबाबत जगात फक्त आम्हाला माहिती आहे, अशी दर्पोक्तीही त्यांनी केली.

पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनीही हिंदुस्थानविरोधात गरळ ओकली आहे. हिंदुस्थान दुष्ट, कट्टर हिंदुत्ववादी आणि दहशतवाद पसरवणारा देश आहे, हे आंतरराष्ट्रीय समुदायाने समजून घ्यावे, असे त्यांनी म्हटले आहे. कॅनडाने हिंदुस्थानवर केलेला खूप मोठा आणि गंभीर आरोप आहे. यामुळे हिंदुस्थानचा खरा चेहरा जगासमोर आला आहे. आंतरराष्ट्रीय समुदाय हिंदुस्थानला कधीपर्यंत पाठिशी घालणार, असा सवाल करत आंतरराष्ट्रीय सुमदायावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. पाकड्यांच्या वक्तव्यांमुळे हिंदुस्थान- कॅनडातील वादामुळे ते चेकाळले असल्याचे दिसून येत आहे.