
इतरांच्या तुकड्यावर अवलंबून असलेल्या पाकिस्तानची स्थिती सध्या इतकी वाईट आहे की त्यांच्याकडे खायला पैसे नाहीत. पाकिस्तानातील इंधन कंपन्यांनी स्वत:च्या नामशेष होण्याची चिंता व्यक्त केली आहे. एकीकडे पाकिस्तान जगासमोर पैशांसाठी ‘भिकेचा कटोरा’ घेऊन उभा आहे. मात्र पाकिस्तानचा वझीर-ए-आझम काही सुधारण्याचे नाव घेत नाही. आज 5 फेब्रुवारी रोजी काश्मीरमध्ये घडलेल्या हिंदूंच्या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या वतीने काश्मीर एकता दिवस साजरा करण्यात येतो. यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी काश्मीरच्या मुद्द्यावरून हिंदुस्थानविरोधात पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
शाहबाज म्हणाले की, “हिंदुस्थानी सैन्याने पसरवलेला कोणताही दहशतवाद काश्मिरींच्या इच्छेला भंग करू शकत नाही, तसेच त्यांचा कायदेशीर संघर्ष देखील कमकुवत करू शकत नाही.”
दरम्यान, जम्मू आणि काश्मीरबाबत ओआयसी संपर्क गटाची संयुक्त राष्ट्रात एक अनौपचारिक बैठक पार पडली. ज्यामध्ये अझरबैजान, नायजर, पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि तुर्की हे देश सामील झाले होते. पाकिस्तानचे राजदूत मुनीर अक्रम यांनी ही बैठक बोलावली होती. ते म्हणाले की, हिंदुस्थानकडून मोठ्या प्रमाणावर दडपशाही सुरू आहे. मात्र असे असूनही काश्मिरी नागरिक त्यांच्या स्वयंनिर्णयाच्या अधिकारासाठी संघर्ष सुरू ठेवत आहेत.
पाकिस्तान सरकारच्या या कृतीमुळे नागरिक मात्र त्यांच्यावर नाराज आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहबाज सरकार काश्मीरची आर्थिक स्थिती सुधारण्याऐवजी दुसऱ्याच गोष्टीकडे लक्ष केंद्रित करत आहे. देशाची आर्थिक स्थिती बिघडली असताना, काश्मीर एकता दिनाच्या प्रचारात शाहबाज पाण्यासारखा पैसा खर्च करत आहेत. तसेच हिंदुस्थानविरोधात वेगवेगळे डावपेच आखले जात आहेत. असे लोक म्हणत आहेत.





























































