तीन महिन्यांत 1029 वेळा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, 3 जवान शहीद

179

जम्मू-कश्मीरात पाकिस्तानकडून दिवसेंदिवस शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यांत पाकिस्तानी सैन्याकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर 950 वेळा आणि जम्मूच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर 79 वेळा असे तब्बल 1029 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले गेले. गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा झाला. यामध्ये तीन महिन्यांत 3 जवान शहीद झाले, तर 7 जवान जखमी झाले आहेत. दरम्यान, शस्त्रसंधी उल्लंघनाचे हे प्रमाण सरासरी रोज 11 ते 12 वेळा आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली. राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात लेखी उत्तरात संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी ही माहिती दिली आहे.

पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीर सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन रोखण्यासाठी हिंदुस्थानी लष्कराकडून गंभीर दखल घेतली जात आहे. शस्त्रसंधी उल्लंघनाला योग्य प्रत्युत्तर दिले जात आहे, असे नाईक यांनी सांगितले. शस्त्रसंधी उल्लंघनाबाबत पाकिस्तानी सैन्याच्या अधिकाऱ्यांना कल्पना देण्यात आली आहे. हॉटलाईनवर संपर्क साधला. डीजीएमओ स्तरावर चर्चा, फ्लॅग मिटींग झाल्याचेही त्यांनी सांगितले. सीमेवर होणारी दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचाही वापर केला जात आहे, असे त्यांनी सांगितले.

रोज 11 ते 12 वेळा उल्लंघन

ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यात 1029 वेळा  पाकडय़ांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यानुसार 92 दिवसात रोज सरासरी 11 ते 12 वेळा हे उल्लंघन झाले आहे.

सियाचीनमध्ये बर्फाखाली दबून चार जवान शहीद

सियाचीन ग्लेशिअरच्या उत्तरेकडे हिमस्खलन होऊन गस्तीवर असलेले लष्कराचे चार जवान शहीद झाले, तर दोन पोर्टरांचाही मृत्यू झाला. सोमवारी दुपारी 3.30च्या सुमारास ही दुर्घटना घडली. लष्कराने घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे.

जवळपास 18 हजार फूट उंचीवर झालेल्या हिमस्खलनात लष्कराच्या काही चौक्यासुद्धा बर्फाखाली सापडल्या. दहा दिवसांपूर्वी कश्मीरमध्ये हिमस्खलनात लष्कराचे दोन जवान शहीद झाले होते. ती घटना ताजी असतानाच सियाचीनमध्ये हिमस्खलन झाले.

आपली प्रतिक्रिया द्या