
पाकिस्तानच्या चार प्रांतांना एकूण 12 राज्यांमध्ये विभागणी करण्याची तयार सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती दळणवळण मंत्री अब्दुल अलीम खान यांनी दिली. देशात छोटे-छोटे राज्य बनवल्यास प्रशासन अधिक चांगले होईल, असे ते या वेळी म्हणाले. सिंध आणि पंजाबमध्ये प्रत्येकी तीन नवीन प्रांत तयार केले जाऊ शकतात. अशीच विभागणी बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वामध्येदेखील होऊ शकते.
पाकिस्तानच्या आजूबाजूच्या देशांमध्ये अनेक लहान-लहान प्रांत आहेत. म्हणून पाकिस्तानमध्येही असेच व्हायला हवे, असे ते म्हणाले. अलीम खान यांचा आयपीपी पक्ष हा पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या आघाडी सरकारमधील एक पक्ष आहे. पाकिस्तान सरकारकडून अद्याप अधिकृत नकाशा जारी करण्यात आलेला नाही. शहबाज सरकारमध्ये सामील असलेल्या बिलावल भुट्टो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीने मात्र याला विरोध दर्शवला आहे. गेल्या महिन्यात सिंधचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी स्पष्टपणे इशारा दिला होता की, सिंधच्या हिताविरुद्ध कोणतेही पाऊल स्वीकारले जाणार नाही. नवीन प्रांतांच्या अफवांवर लक्ष देऊ नका आणि कोणतीही शक्ती सिंधची फाळणी करू शकत नाही, असे मुख्यमंत्री मुराद म्हणाले होते. पीपीपीव्यतिरिक्त अनेक छोटे पक्षही या विभाजनाच्या विरोधात आहेत.

























































