सीमेजवळ पाकिस्तानी विमानांच्या घिरटय़ा,हिंदुस्थानी हवाई दल अलर्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

पाकडय़ांच्या कुरापती सुरूच असून, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी हवाई दलाची दोन विमाने घिरटय़ा घालताना दिसली आहेत. यामुळे हिंदुस्थानी लष्कराने ‘एअर डिफेन्स सिस्टम’ला हायअलर्ट जारी केला आहे. सर्व सीमांवर हवाई दलास अलर्ट केले आहे.

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेताना हिंदुस्थानी हवाई दलाने 26 फेब्रुवारीला एअर स्ट्राइक करून बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 27 फेब्रुवारीला पाकच्या एफ-16 विमानांनी हिंदुस्थानच्या हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न केला होता. हिंदुस्थानी हवाई दलाने जोरदार प्रत्युत्तर देऊन पाकचे एफ-16 पाडले होते. सध्या सीमेवर तणाव कायम असतानाच पुन्हा पाकच्या विमानांनी घिरटय़ा घातल्या आहेत. पुंछ सेक्टरपासून जवळच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पलीकडे 10 कि.मी.च्या परिसरात पाकव्याप्त कश्मीरमध्ये दोन लढाऊ विमाने घिरटय़ा घालताना मंगळवारी रात्री दिसली होती. ही विमाने हिंदुस्थानच्या रडार यंत्रणेने टिपली असून, हवाई दलास ‘हाय अलर्ट’ जारी केला आहे.