
हिंदुस्थानमध्ये या ना त्या मार्गाने अराजकता माजवण्यासाठी पाकिस्तान (Pakistan) आणि आयएसआय (ISI) नेहमीच प्रयत्नशील असतात. आताही एलओसीवरून घुसखोरी करून दहशतवाद्यांना हिंदुस्थानमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि अराजकता पसरवण्यासाठी पाकिस्तान-आयएसआय एक ऑपरेशन राबवत होते. याला ‘ऑपरेशन ग्लायडर’ (Operation glider) असे नाव देण्यात आले होते आणि पाकिस्तानचा हा डाव हिंदुस्थानने उधळून लावला असून हे ऑपरेशन डिकोड करण्यात यश मिळवले आहे.
थंडीच्या दिवसांमध्ये जम्मू-कश्मीरमध्ये घुसखोरी करून दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तान-आयएसआय सीमारेषेपलीकडे दहशतवाद्यांचे अड्डेही चालवत आहे. यासाठी ‘ऑपरेशन ग्लायडर’ची योजना पाकिस्तान-आयएसआयने आखली होती. परंतु या योजनेचा भांडाफोड हिंदुस्थानने केला असून सीमारेषेवरील जवानांना अलर्ट केले आहे. आयबीने याबाबत एक अहवालही प्रसिद्ध केला आहे.
कश्मीरमध्ये पोलिसांच्या बसवर दहशतवादी हल्ला; दोन पोलीस शहीद, 14 जण जखमी
लाईन ऑफ कंट्रोलजवळ दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड कार्यरत आहेत. या लॉन्च पॅडवरील दहशतवादी ग्लायडरच्या सहय्याने हिंदुस्थानमध्ये पाठवण्याचा प्लान पाकिस्तानने आखला आहे. यासाठी आयएसआय सिंगल रायडरवाले ग्लायडरही उपलब्ध करून देत आहे. याद्वारे 20 किलोग्राम स्फोटके आणि एके-47 रायफल पाठवता येतात.
सीमारेषेपलीकडे असणाऱ्या लॉन्चिंग पॅडद्वारे लॉन्च होणारे ग्लायडर 600 मीटर पासून ते 1200 मीटर पर्यंत आत दाखल केले जावू शकतात. आयएसआय हे ग्लायडर उपलब्ध करून देत असून 50 ते 100 मीटर उंचावरून प्रवास करता येतो, अशीही माहिती गुप्तचर यंत्रणेने दिली आहे.
लॉन्च पॅडवर लश्कर ए तोयबा आणि जैश ए मोहब्बतेचे 8000 हून अधिक दहशतवाद्यांना हिंदुस्थानमध्ये घुसखोरी करण्यासाठी ट्रेनिंग दिले जात आहे. पीओकेमार्गे या दहशतवाद्यांना हिंदुस्थानमध्ये घुसखोरी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे सुरक्षा जवान अलर्ट झाले आहेत.




























































