
कश्मीर खोऱयात दहशतवाद्यांनी पुन्हा डोके वर काढले असून तीन दिवसांत दुसऱयांदा पोलीस पथकाला टार्गेट केले. सोमवारी सायंकाळी श्रीनगरच्या पोलिस कॅम्पजवळील झेवन परिसरात पोलिसांच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात दोन पोलीस शहीद झाले, तर 14 जण जखमी झाले. हल्ला करून पळालेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण श्रीनगरमध्ये नाकाबंदी करण्यात आली आहे.
तीन दिवसांपूर्वी कश्मीरच्या बंदीपोरा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पोलीस पथकावर बेछूट गोळीबार केला होता. त्यात दोन पोलीस शहीद झाले होते. ती घटना ताजी असतानाच दहशतवाद्यांनी पुन्हा श्रीनगरमध्ये पोलिसांच्या बसवर हल्ला केला. सोमवारी सायंकाळी झेवन परिसरातील पंथा चौकात दोन ते तीन दहशतवादी घुसले आणि त्यांनी पोलिसांच्या कॅम्पजवळील बसवर अंदाधुंद गोळीबार केला. या बसमधून जम्मू-कश्मीर सशस्त्र पोलीस दलाच्या नवव्या बटालियनचे 25 जवान प्रवास करीत होते.
दहशतवादी संघटना ‘जैश-ए-मोहम्मद’च्या कश्मीर टायगर्सने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्ल्याची गंभीर दखल घेत तपास यंत्रणांकडून हल्ल्याबाबत अधिक तपशील मागवला आहे.
अतिसुरक्षित भाग टार्गेट
हल्ला झालेल्या परिसरात जम्मू-कश्मीर पोलिसांच्या प्रशिक्षण केंद्रासह लष्कर आणि सीआरपीएफचे अनेक कॅम्प्स आहेत. या अतिसुरक्षित भागात दहशतवाद्यांनी घुसखोरी करून थेट पोलिसांच्या बसवर हल्ला केल्यामुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आठवडाभरात दुसऱयांदा पोलिसांना टार्गेट केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.



























































