
पालघर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी गणपती विसर्जन करताना चार जण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृतांमध्ये वाडा तालुक्यातील तिघांचा तर वसई तालुक्यातील एकाचा समावेश आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात हळहल व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाडा तालक्यातील कोनसई येथील नाल्यात जगत नारायण मौर्य (वय – 38) आणि सुरज नंदलाल प्रजापती (वय -25) हे दोन तरुण बुडाले. हे दोघेही उत्तर प्रदेश येथील रहिवासी होते. प्रेम रतन या कंपनीमध्ये कामगार म्हणून करत होते. त्यांनी दीड दिवसांच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठापना केली होती. विसर्जन करताना पाण्याचा अंदाज न झाल्याने दोघेही बुडाले.
तर गो-हे येथील तलावात बुडून प्रकाश नारायण ठाकरे (वय – 35) यांचा बुडून मृत्यू झाला. वसई पूर्वेच्या पारोळ गावातील संजय हरिश्चंद्र पाटील (वय – 45) यांचा तानसा नदीत बुडून मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही.
विसर्जन करताना काळजी घ्या
गणेश विसर्जन दरम्यान गणेश भक्तांचा उत्साह हा शिगेला पोहचतो. गणपतीचे विसर्जन करताना खोल पाण्यात उतरू नका अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. मात्र गणेश भक्तांकडून कित्येक वेळेस नियमांकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी दुर्घटना घडतात.