भारती कामडी, सुरेश म्हात्रे आज अर्ज दाखल करणार; शरद पवार, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्या उपस्थितीत रॅली

palghar-lok-sabha-constituency

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पालघर लोकसभेतील उमेदवार भारती कामडी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता हजारो शिवसैनिक छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत दणक्यात रॅली काढणार आहेत. तर भिवंडी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे हेदेखील उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना नेते खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहेत.

पालघर लोकसभा मतदारसंघात गद्दारविरुद्ध निष्ठावान असा सामना रंगणार आहे. शिवसेना उमेदवार भारती कामडी यांना मतदारांचा जोरदार प्रतिसाद मिळत असून त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. उद्या येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झाल्यानंतर भारती कामडी हजारो शिवसैनिक व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या रॅलीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला

भारती कामडी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे उपस्थित राहणार असल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे. दरम्यान उद्याच भिवंडी लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश म्हात्रे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी शरद पवार, संजय राऊत यांच्यासह आघाडीचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे पालघर व भिवंडी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा आवाज घुमणार आहे.