
वाडा ग्रामीण रुग्णालय आणि विक्रमगड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गरीब, शेतकरी आणि आदिवासी रुग्णांची खासगी रुग्णालयांकडून लूट सुरू आहे. यासाठी एक मोठे संघटित ‘रेफरल रॅकेट’ सक्रिय असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पालघर जिल्हाप्रमुख अॅड. ओमकार पाटील यांनी केला आहे.
या गंभीर प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी डॉक्टरांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी त्यांनी पालघर जिल्हाधिकारी, सिव्हिल सर्जन आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
अशी सुरू आहे लूट
शासकीय डॉक्टर आणि खासगी हॉस्पिटल्स यांच्यात साटेलोटे असून प्रत्येक पेशंटमागे मोठ्या रकमेचे कमिशन दिले जात आहे. या रॅकेटमुळे गरीब रुग्णांना खासगी रुग्णालयांचे लाखो रुपयांचे बिल भरण्यासाठी दागिने गहाण ठेवावे लागत आहेत किंवा कर्जबाजारी व्हावे लागत आहे. अनेक रुग्णांचे रेफरल लेटर्स आणि पीडित रुग्णांच्या नातेवाईकांच्या तक्रारी अॅड. ओमकार पाटील यांच्याकडे आल्यानंतर हा भंडाफोड झाला.
अॅड. ओमकार पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे की, शासकीय नियमांनुसार ग्रामीण किंवा उपजिल्हा रुग्णालयात पुरेशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसतील तरच पुढील उपचारासाठी रुग्णांना पालघर जिल्हा रुग्णालयात रेफर करणे बंधनकारक आहे. मात्र वाडा आणि विक्रमगडमधील काही डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी जाणीवपूर्वक पालघर सिव्हिल हॉस्पिटल सक्षम नसल्याचा खोटा प्रचार करत आहेत.
रुग्णालयात व्हेंटिलेटर किंवा डॉक्टर उपलब्ध नाहीत अशी भीती रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये निर्माण करून त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये जाण्यास भाग पाडले जात आहे. त्यामुळे वाडा आणि विक्रमगड रुग्णालयातून गेल्या सहा महिन्यांत जितके रुग्ण ‘रेफर’ केले गेले, त्याची सखोल चौकशी व्हावी.
तसेच रुग्णांची दिशाभूल करणाऱ्या आणि खासगी रुग्णालयांचे रस्ते दाखवणाऱ्या दोषी डॉक्टरांवर व कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी अॅड. ओमकार पाटील यांनी केली आहे.
“पालघर जिल्ह्यातील गरीब आणि आदिवासी जनतेच्या आरोग्याशी आणि पैशांशी चाललेला हा खेळ शिवसेना कदापि सहन करणार नाही. या ‘प्रायव्हेट रेफरल रॅकेट’ची पुढील १५ दिवसांच्या आत उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई व्हावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.” — अॅड. ओमकार पाटील, जिल्हाप्रमुख, शिवसेना



























































