
सामना प्रतिनिधी। परंडा
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूला विठ्ठलच्या दर्शनासाठी निघालेल्या अनेक लहान – मोठ्या दिंड्या शहरात दाखल होत आहेत. या दिंड्या पुढे परंडा – मुंगशी मार्गे पंढरपूरकडे रवाना होतील. पण सध्या या परंडा – मुंगशी पालखी मार्गाची पार दुरावस्था झाल्याने वारकऱ्यांना यामुळे अडचणीचा सामना करावा लागणार आहे. तेव्हा या पालखी मार्गाची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे.
आषाढी वारीसाठी निघालेली संत एकनाथ महाराजांची पालखी दिनांक १६ जुलै रोजी परंडा मुक्कामी येत आहे. या पालखी सोहळ्यामध्ये सुमारे १५ ते २० हजार वारकरी पायी चालत पंढरपूरकडे जातात. परंडा येथील मुक्काम आटोपून ही पालखी १७ जुलै रोजी सकाळी मुंगशी मार्गे पंढरपूरकडे रवाना होणार आहे.
मात्र सध्या परंडा येथून मुंगशीकडे जाणाऱ्या या मार्गावर मोठ – मोठे खड्डे पडले आहेत. तसेच अनेक ठिकाणी खडी उखडून पडली आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पाणी साचून ते अधिकच धोकादायक बनले आहेत. या रस्त्यावरुन वारकऱ्यांना चालत जाताना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. तेव्हा या बाबीची गंभीर दखल घ्यावी आणि हा पालखी मार्ग तात्काळ दुरुस्त करावी अशी मागणी नागरीक तसेच भाविकातून होत आहे.

























































