कोश्यारी, चंद्रकांत पाटील यांची हकालपट्टी करा ‘पंढरपूर बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापुरुषांविषयी वादग्रस्त विधाने करणाऱया राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मंत्री चंद्रकांत पाटील यांची हकालपट्टी करावी, या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या ‘पंढरपूर बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. व्यापारी व नागरिकांनी दुकाने बंद ठेवून सहभाग घेतला. दरम्यान, आंबेडकरी संघटना व सर्वपक्षीयांनी शहरातून मोर्चा काढत बंद यशस्वी केल्याचे चित्र दिसून येत होते.

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मंत्री चंद्रकांत पाटील व भाजप नेते सातत्याने अवमानकारक भाष्य करीत आहेत. महापुरुषांच्या अवमानप्रकरणी आंबेडकरी संघटना व सर्व पक्षांनी आज ‘पंढरपूर बंद’ची हाक दिली होती. या बंदला व्यापारी व दुकानदारांनी, तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. सोमवारी सकाळपासून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातील प्रासादिक साहित्याची दुकाने उघडण्यात आली होती. मात्र, ‘पंढरपूर बंद’ची हाक देण्यात आलेली आहे, हे समजताच दुकाने बंद करण्यात आली. व्यापारी व नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंदला पाठिंबा दर्शविला. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील सफला एकादशी असूनही दुकाने बंदच होती.

सकाळी 10 वाजता महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे दाखल झाला. येथे ‘या सरकारचे करायचे काय… खाली मुंडी, वर पाय…’ अशी जोरदार घोषणाबाजी करीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मंत्री चंद्रकांत पाटील यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी करण्यात आली.

राष्ट्रवादीचे नागेश फाटे, किरणराज घाडगे, सुधीर भोसले, उमेश सासवडकर, संदीप मांडवे, काँग्रेसचे अमरजित पाटील, समीर कोळी, राजेश भादुले, वंचित बहुजन आघाडीचे सुनील वाघमारे, सागर गायकवाड, रिपाइंचे ऍड. कीर्तिपाल सर्वगोड, जितेंद्र बनसोडे, अमित कसबे, विशाल मांदळे, आम आदमी पार्टीचे महादेव पाटील, दिलीप देवकुळे, तसेच कृष्णा वाघमारे, संतोष सर्वगोड, अखिलेश वेळापूर, अमर शेवडे, महेंद्र जाधव, अंबादास वायदंडे आदींसह विविध पक्षांचे व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी या बंदमध्ये सहभागी झाले होते. शहर पोलीस निरीक्षक अरुण फुगे व मंडल अधिकारी शिवशरण यांना निवेदन देण्यात आले.