वारकरी, पंढरपूरकरांनी बनवला भूवैकुंठ पंढरी विकास आराखडा 1 लाख चौरस मीटरपेक्षा जास्त जागेवर सुचविली विकासकामे

स्थानिकांची एक इंचदेखील जागा ताब्यात न घेता वारकरी, व्यापारी व नागरिकांनी तयार केलेला ‘भूवैकुंठ पंढरी विकास आराखडा’ सोमवारी जिल्हाधिकाऱयांमार्फत शासनाला सादर करण्यात आला. विशेष म्हणजे यामध्ये एक लाख चौरस मीटरपेक्षा जास्त जागेवर विकासकामे सुचविल्याची माहिती रामकृष्ण महाराज वीर यांनी दिली.

वाराणसी, उज्जैनच्या धर्तीवर पंढरपुरातही कॅरिडॉरची घोषणा राज्य शासनाने केली होती. मात्र, याला स्थानिकांसह वारकऱयांनी कडाडून विरोध केला. पंढरपूरचे आध्यात्मिक वेगळेपणे, वारकरी परंपरा याची तुलना इतर तीर्थक्षेत्रांशी करू नये, असे सर्वांचे मत होते. यावर शासनाने कॉरिडॉर विरोधकांना आराखडा सादर करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार महाराज मंडळी, नागरिक, व्यापाऱयांच्या सूचनांचा विचार करून भूवैकुंठ विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखडय़ामध्ये 1 लाख 9 हजार 356 चौरस मीटर जागेवर विकासकामे सुचविण्यात आली आहेत. तर, दुसरीकडे शासनाने शेकडो घरे बाधित करून 72 हजार चौरस मीटर जागेवर विकासकामे सुचवली आहेत. विशेष म्हणजे स्थानिकांच्या आराखडय़ामध्ये एक इंचदेखील रुंदीकरण अथवा खासगी जागा ताब्यात घेण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला नाही. यामुळे शासनाच्या निधीची बचत होणार असून, याला विरोध होणार नसल्याचे वीर महाराज यांनी स्पष्ट केले.

सोलापूर येथे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना व्हिडीओ स्वरूपात आराखडय़ाचे सादरीकरण करण्यात आले. समस्त वारकरी दिंडी समाज संघटना, वारकरी पाईक संघ, पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती व संत भूमी बचाव समिती यांच्या वतीने हा आराखडा तयार करण्यात आला आहे. तर नीलेश बडवे-महाजन व मयूर पिंपळनेरकर यांनी आराखडय़ाची तांत्रिक बाजू सांभाळली आहे.

मंदिर समितीच्या जागेवर वैद्यकीय महाविद्यालय, सर्वोपचार रुग्णालय

 टिळक स्मारक मैदान येथे मंदिर समितीचे भव्य अन्नछत्र उभारावे, तसेच वारकरी सुविधा केंद्र करून स्नान, भाविकांचे सामान ठेवण्यासाठी लॉकरूम उभारावे. जिजामाता उद्यान येथे संतांच्या मोठय़ा मूर्ती, भित्तिचित्रे, ऑडिओ टेलिफिल्म व उर्वरित जागेत शॉपिंग सेंटर उभारावे. शहराच्या चारही बाजूला शासकीय जागा असून, येथे 65 एकरप्रमाणे वारकऱयांना सुविधा द्याव्यात. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची 90 एकर जमीन असून, याठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय उभारावे. मध्य प्रदेश भवन येथे तृतीयपंथीयांसाठी आधार केंद्र उभारावे. चौफाळा ते महाद्वार हा रस्ता नो व्हेईकल झोन करावा, अशा सूचना या आराखडय़ात करण्यात आल्या आहेत.

दर्शन मंडपाचा आकार विठुरायाच्या गंधाप्रमाणे

 चंद्रभागेच्या वाळवंटात उत्तर ते दक्षिण घाटालगत पूल उभारल्यास पर्यायी रस्ता होणार असून, उद्धव घाट ते विप्रदत्त घाट नवीन प्रदक्षिणा मार्गदेखील तयार होणार आहे. महाद्वार घाटावरून चंद्रभागेच्या पैलतीरावर 60 फुटी रुंद पूल उभारून यावर मध्यभागी विविध संतांचे भव्य पुतळे उभे करावेत. पदस्पर्श दर्शन मंडप सध्याच्या खादी ग्रामोद्योग जागेत उभारून टोकन दर्शन सुरू करावे. सदर जागा मंदिराजवळ असून, यामुळे भाविकांची पायपीट वाचणार आहे. या दर्शन मंडपाचा आकार विठुरायाच्या गंधाप्रमाणे असावा.