
कोरोनाचे सर्व निर्बंध राज्यशासनाने मागे घेतल्यानंतर मंगळवारी चैत्री एकादशीचा सोहळा साजरा होत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे दोन लाखांहून अधिक वारकरी भाविक पंढरपुरात दाखल झाले असून, अवघी पंढरीनगरी विठुरायाच्या नामघोषाने दुमदुमून गेली आहे.
पंढरपुरात भरणाऱ्या चार महत्त्वाच्या यात्रांपैकी ‘चैत्री यात्रा’ म्हणून ओळखली जाते. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे हरी व हर अर्थात विष्णू व महादेव यांच्यामध्ये भेदाभेद नसल्याचा संदेश देणारी ही वारी आहे. येथे पांडुरंगाने आपल्या मस्तकावर महादेवाला स्थान दिले आहे. यामुळेच शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाच्या यात्रेसाठी येणारे भाविक विठुरायाचेदेखील दर्शन घेतात. महादेवाच्या लग्नासाठी कावड घेऊन जाण्याची परंपरा आहे. अनेक भाविक प्रथम पंढरीत देवाचे दर्शन घेऊन येथूनच कावड नाचवत शिंगणापूरला जातात.
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून चैत्री यात्रा भरलीच नाही. यामुळे यंदा मागील चार ते पाच दिवसांपासून भाविकांनी दर्शनासाठी पंढरीत गर्दी केली आहे. असह्य उन्हाळा असतानाही सध्या जवळपास दीड लाख भाविक विठ्ठल नगरीत तळ ठोकून आहेत. 65 एकरचा परिसर राहुट्यांनी गजबजला आहे. यासह चंद्रभागेचे वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग येथे भाविकांची गर्दी झाली आहे. दशमी दिवशी देवाच्या पदस्पर्श दर्शनाची रांग पत्राशेडनजीक होती. दर्शनासाठी पाच तासांहून अधिक वेळ लागत आहे. मंदिर समितीच्या वतीने भाविकांना रांगेत थंड पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. चंद्रभागेच्या पात्रातील पाणी कमी झाल्यामुळे प्रशासनाने याची दखल घेत दगडी पुलानजीक असणाऱ्या बंधाऱ्यातून रविवारी पाणी सोडले आहे. यामुळे भाविकांची स्नानाची सोय झाली आहे. यासह 65 एकर येथे वीज, पाणी आदी सुविधा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, कोरोनाच्या महामारीमुळे 2020 साली मार्च महिन्यात मंदिर बंद करण्यात आले होते. इतिहासात प्रथमच चैत्रीवारी रद्द करण्यात आली. योगायोगाने चैत्री यात्रेपूर्वीच पदस्पर्श दर्शन सुरू झाल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
वारीच्या निमित्ताने प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. एकादशीच्या पहाटे श्री विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांच्या हस्ते, तर रुक्मिणीची नित्यपूजा सदस्य प्रकाश महाराज जवंजाळ यांच्या हस्ते होणार आहे. एकादशीनिमित्त मंदिरात द्राक्षांची आरास करण्यात येणार आहे.
विठुरायाला आज पुरणपोळीचा नैवेद्य
चैत्रीवारीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एकादशी दिवशी देवाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची परंपरा आहे. कर्नाटकातील कृष्णदेवराय राजाने येथील विठुरायाची मूर्ती हम्पी येथे स्थापन केली होती. ही मूर्ती पुन्हा भानुदास महाराज यांनी पंढरीत आणून चैत्री एकादशीस स्थापन केली. यामुळे चैत्रीस देवास पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची परंपरा आहे.



























































