
वसुबारसपासून दीपावली महोत्सवास सुरवात झाली आहे. नरकचतुर्दशीनिमित्त सोमवारी दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणीला पोशाखावेळी अलंकार परिधान करण्यात आले. श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे पारंपरिक अलंकाराच्या वेशातील मनमोहक रूप पाहण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.
मंदिर समितीचे प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्री विठ्ठलास सोन्याचा मुकुट, नाम निळाचा, कौस्तुभ मणी, दंड पेट्या जोड मोठा, हिऱ्याचा कंगण जोड, मोत्याचा तुरा, मोत्याची कंठी एक पदरी, मोत्याची कंठी दोन पदरी, नेकलेस, शिरपेच मोठा 10 लोलक असलेला, मस्त्य जोड, तोडे जोडे, सूर्य कळ्यांचा हार, सोन्याचे पैंजण जोड, तुळशीची माळ एक पदरी, नक्ष्मी टोप आदी अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.
श्री रुक्मिणी मातेस सोने मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवामनी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मी हार, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा आदी अलंकार परिधान करण्यात आले आहेत. तसेच श्री राधिका मातेस नक्षी टोप, ठुशी नवीन, मोत्याचा कंठा मोठा, पुतळ्यांची माळ, व श्री सत्यभामा मातेस सिद्धेश्वर टोप, मोत्याचा कंठा, ठुशी नवीन, पुतळ्यांची माळ आदी अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.