
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी येत्या 30 सप्टेंबरपर्यंत श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा धोरणात्मक निर्णय मंदिर व्यवस्थापनाने घेतला आहे. याबाबत मंदिराचे कार्यकारी अधिकारी सुनील जोशी यांनी भाविकांच्या माहितीसाठी प्रसिद्धी पत्रक काढले आहे.
मंदिर खुले करावे यासाठी कालच आंदोलन झाले होते. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी आज बैठक घेऊन याबाबत निर्णय घेतला. गेल्या 22 मार्चपासून विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. ‘अनलॉक चार’मध्ये धार्मिक स्थळे आणि शाळा बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार मंदिर समितीने आज पत्राद्वारे मंदिर 30 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्यासह 1200 जणांवर गुन्हा
कोरोनाच्या अनुषंगाने लॉकडाऊनच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात असताना जमाव जमवून मास्क न घालता सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर, विश्व वारकरी सेनेचे अरुण महाराज बुरघाटे यांच्यासह 1200 लोकांवर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




























































