
देवरुख-पांगरी रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम पुन्हा सुरू झाले आहे. डोंगर खोदाई करताना ठेकेदाराने योग्य ती काळजी न घेतल्याने पावसात माती रस्त्यावर आल्याने दुचाकी घसरून अपघात होत आहेत. शिवाय चारचाकीच्या वाहनांमुळे ही माती रस्त्यावर लांब पर्यत गेलेली असल्याने रस्तेही लालेलाल झाले आहेत. ठेकेदाराने यावर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.
देवरुख पांगरी बावनदी या मार्गाच्या रुंदीकरणासह मजबुतीकरणाचे काम गेली दोन वर्षे सुरु आहे. हे काम करत असताना ठेकेदाराकडून आवश्यक ती काळजी घेतली जात नसल्याने वाहनचालकांना वाहने चालविणे अवघड बनले आहे.
या रस्त्याचे काम होत असताना बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याने याचा फटका गेली दोन वर्षे वाहनचालकांना बसत असल्याचा आरोप वाहनचालकांनी केला आहे. धोकादायक ठिकाणी फलक न लावणे, रस्त्यावर आलेली खडी बाजूला न करणे, रस्त्यावर चिखलमिश्रित माती येणे अशा प्रकारांमुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत आहेत.
बावनदी नजीकच्या दत्त मंदिरासमोर मोठमोठे खड्डे पडले असून यामध्ये पावसाचे पाणी साठल्यानंतर खड्ड्यांच्या खोलीचा अंदाजच येत नाही. यामुळे चारचाकी गाड्यांचे तळ खड्ड्यात घासून गाड्यांचे नुकसान होत आहे. दुचाकीचे पुढील चाक खड्ड्यात गेल्यानंतर दुचाकी खड्ड्यातून बाहेर न येता घसरत असल्याने अपघात घडत आहेत.
विशेष म्हणजे या दत्त मंदिराजवळच ठेकेदाराची वाहने उभी असतात आणि कामगारांची वस्ती देखील आहे. मात्र येथील धोकादायक बनलेले खड्डे देखील ठेकेदाराकडून भरले जात नाहीत याबाबत वाहनचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.



























































