पन्हाळ्याचे सहायक फौजदार लाचलुचपतच्या जाळ्यात

514

दाखल केलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी संशयित आरोपीकडून 22 हजाराची लाच घेताना, पन्हाळ्याचे सहायक फौजदार उमेश आनंद जाधव (54, रा. शुक्रवार पेठ, डी.वॉर्ड, कुंभार गल्ली, कोल्हापूर) यांना पोलीस चौकीतच रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी रात्री हि कारवाई केली.

आज न्यायालयात हजर केले असता, न्यायालयीन कोठडी देण्यात आल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी सांगितले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडुन मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी तक्रारदाराविरोधात पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याचा तपास सहायक फौजदार उमेश जाधव यांच्याकडे असून, गुन्ह्यात मदत करण्यासाठी तक्रारदारकडे त्यांनी प्रथम 30 हजारांची लाच मागितली होती. तडजोडीअंती 25 हजार लाच ठरली.

तक्रारदाराच्या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून याची पडताळणी करण्यात आली होती. त्यानंतर काल गुरुवारी रात्री महाद्वार रोड परिसरातील कसबा- गेट पोलीस चौकीत 22 हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यानी सापळा लावून रंगेहाथ पकडले. याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत होता.

आपली प्रतिक्रिया द्या