पंकजा मुंडेंनी ट्विटरवरून भाजप व माजी मंत्री ही ‘ओळख’ हटवली, आता लक्ष गोपिनाथगडाकडे

27853

‘पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? याबाबत मी 12 डिसेंबरला सांगेन’, अशी फेसबुक पोस्ट भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केल्याने राजकीय चर्चा सुरू झाली. याच दरम्यान पंकजा मुंडे यांनी ट्विटरवरून भाजप आणि माजी मंत्री ही ‘ओळख’ही हटवली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या मनामध्ये नक्की काय आहे याबाबत तर्क वितर्कांना उधाण आले आहे.

परळी मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या पंकजा मुंडे यांचा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी धक्कादायक पराभव केला. त्यानंतर राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकारही स्थानापन्न झाले. आता पुढची रणनीती काय? याविषयी पंकजा मुंडे 12 डिसेंबर म्हणजेच दिवंगत वडील गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिनी ठरविणार असल्याचे त्यांनी फेसबुकवर लिहिले. त्यानंतर त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून भाजपची ओळखही हटवली आहे.

पंकजा मुंडे यांनी आपल्या ट्विटर हॅंडलमध्ये कुठेही भाजपचा उल्लेख केलेला नाही. यापूर्वी त्यांच्या ट्विटर प्रोफाईलमध्ये मंत्रिपदाचा उल्लेख होता. मात्र विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तो हटवण्यात आला. आता त्यांच्या प्रोफाईलवर भाजपबाबत कोणताही उल्लेख नाही. ट्विटर अकाऊंटच्या कव्हरपेजला जनतेला नमस्कार करणारा पंकजांचा फोटो आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा फोटो आहे. गेल्या काही महिन्यात अनेक राजकीय भूकंप झाल्याने आता 12 डिसेंबरला गोपिनाथगडावर पंकजा मुंडे काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

pankaja-munde

काय आहे फेसबुक पोस्ट
आज राजकारणामध्ये झालेले बदल, जबाबदारीत झालेले बदल या सगळय़ा बदलत्या संदर्भांचा विचार करून आपला पुढचा प्रवास ठरविण्याची आवश्यकता आहे. आपण माझ्याकडे वेळ मागत आहात… मी आपल्याला वेळ देणार आहे. आठ ते दहा दिवसांनंतर… हे आठ-दहा दिवस मला थोडासा स्वतःशी संवाद साधण्यासाठी वेळ हवाय, असे पंकजा मुंडे यांनी फेसबुकमध्ये म्हटले आहे. या पोस्टची चर्चा सुरू झाली असून 12 तारखेला त्या काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या