पोलिसांपासून स्वतःला वाचविण्यासाठी काकाने लावला पुतणीच्या गळ्याला कोयता, बहाद्दर पोलिसांनी वार हातावर झेलत मुलीला सोडवले

पोलिसांपासून वाचण्यासाठी काकाने पुतणीच्या गळ्यावर कोयता ठेवून तिला ठार मारण्याची धमकी दिली. मात्र पनवेलच्या बहाद्दर पोलिसांनी अट्टल गुन्हेगारास शिताफीने अटक केली. सोबन महतो (३५) असे आरोपीचे नाव आहे. कुऱ्हाड आणि कोयत्याने वार झालेल्या जखमी पोलिसांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रॉपर्टीच्या वादातून महतो हा गोडसे आळी येथील भाडेकरूच्या घरामध्ये कुलूप तोडून घुसला. त्याच्या सोबत आई-वडील, भाऊ व भावाची मुले होती. घटनास्थळी पोलीस पोहचताच आरोपीने पुतणी निकिता हिच्या गळ्याला कोयता लावून तिला ठार मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी मुलीच्या सुटकेसाठी प्रयत्न करताच त्याने कोयता आणि कुऱ्हाडीने पोलीस पथकावर हल्ला केला. यामध्ये पोलीस रवींद्र पारधी, सम्राट डाकी, माधव शेवाळे व साईनाथ मोकल जखमी झाले.