त्रिशुर (केरळ) येथे झालेल्या पहिल्या पॅरा मास्टर्स नॅशनल इनडोअर गेम्समध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना मुंबईच्या सुशील नामदेव शिंदे याने 10 मीटर एअर रायफल शूटिंगमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली. सुशील शिंदेच्या या यशामुळे कंसाय, जपान येथे 2022 मध्ये होणाऱया वर्ल्ड पॅरा मास्टर्स गेम्ससाठी त्याची निवड होण्याची दाट शक्यता आहे.
सुशील शिंदेच्या शानदार कामगिरीमुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सुशील शिंदे हा ताराई फाऊंडेशन संस्थेतर्फे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून दिव्यांगांना नृत्य, गायन, अभिनय व खेळाचे प्रशिक्षण ड्रीम्स ऍकॅडमी फॉर दी डिसेबल्ड या नावाने मोफत देत आहे. आर्थिक बाजू कमकुवत असलेल्यामुळे सुशील शिंदेला सदर स्पर्धेमध्ये जाण्यासाठी महापौर किशोरी पेडणेकर, नगरसेवक मंगेश सातमकर, नगरसेवक श्रीकांत शेटये तसेच इन्सानियत संस्थेचे अध्यक्ष अर्जुन मेघे यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.































































