फेसबुकवर पोस्ट टाकून तो गेला, पण पोलिसांनी माघारी आणले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जुगाराचा नाद आणि कर्जाच्या डोंगरामुळे नैराश्यातून एका वकील तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला, पण घाटकोपर पोलिसांनी त्याला वेळीच रोखल्यामुळे अनर्थ टळला आणि तो सुखरूप घरी परतला.

घाटकोपर गोळीबार रोड येथे परमदेव आपल्या मामा-मामीकडे राहतो. त्याचे कुटुंबीय नाशिकला राहतात. रविवारी दुपारी त्याने मी आत्महत्या करतोय अशी पोस्ट फेसबुकवर केली. पोस्ट वाचल्यानंतर त्याच्या घरचे घाबरले. मामीने घाटकोपर पोलीस ठाणे गाठून याबाबत सांगितले. वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र आगरकर व निरीक्षक प्रमोद कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली परमदेवचा शोध सुरू केला.

परमदेवचा मोबाईल स्विच ऑफ असल्याने लोकेशन शोधणे कठीण होते. काही वेळानंतर त्याचा मोबाईल सुरू होताच कोकाटे यांनी त्याला फोन करून बोलण्यात गुंतवले. पवईच्या हिरानंदानी येथील जंगल परिसरात त्याचे लोकेशन मिळाले. त्यानुसार उपनिरीक्षक बांगर, पिसाळ व त्यांचे पथक तेथे वाट काढत पोहचले. झाडाझुडपाने वेढलेल्या विहिरीत तो वेलीची दोरी गळ्याभोवती गुंडाळून पडलेला सापडला. पोलिसांनी तेथे जाऊन परमदेवला बाहेर काढले. जुगाराचा लागलेला नाद आणि त्यामुळे झालेल्या कर्जातून बाहेर पडण्याचा मार्गच सापडत नसल्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्याने सांगितले. कोकाटे यांनी त्याचे समुपदेशन केले आणि त्याला आईवडिलांच्या स्वाधीन केले.