
परभणी जिल्ह्यात शनिवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण निार्माण झाले होते. दुपारच्या सुमारास जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, पूर्णा, सेलू, पाथरी, सोनपेठ तालुक्यात परतीच्या पावसाने हलकी हजेरी लावली. काही तालुक्यातील रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. शिवाय आज सकाळपासून कमी अधिक प्रमाणात पावसाचा जोर कायमच होता. या परतीच्या पावसामुळे मात्र हातातोंडाशी आलेली पिकेही शेतकर्यांच्या हातातून गेल्याचे पहावयास मिळत आहे. प्रशासनाने सोयाबीनच्या नुकसानीचे पंचनामे करून त्वरित मदत जाहीर करावी अशी मागणी होत आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त झाले असून सरासरीपेक्षा जास्तच पाऊस झाला आहे त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना पिकाच्या नुकसानी पोटी शेतकऱ्यांनी काढलेल्या पिकाच्या विमा संरक्षण रक्कम देऊन मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
जूनपासुनच पावसाने दमदार सुरूवात केल्याने पिके ही जोमाने आली मात्र ऐन काढणीच्या वेळीच कोसळणार्या या पावसाने मात्र पिके काही घरी येऊ दिली नाही. जिल्हयातील 9 पैकी 7 तालुक्यात हा पाऊस 100 टक्क्याहून अधिक कोसळला आहे. मागील दहा पंधरा दिवसाने पावसाने उघडीप दिल्याने शेत शिवारात सोयाबीनची सवंगणी करुन मळणीची लगबग सुरू असतानाच शनिवारी रात्रीच्या पावसाच्या सरी वर सरी कोसळत असल्याने शेतात चिखल झाल्याने मळणी यंत्राची चाके जाग्यावर थांबली आहेत. उशीरा पेरणी झालेली सोयाबीन आजही अर्थी अधिक मळणीच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र या पावसामुळे हातात येणार्या उत्पादनाला मुकावे लागते की काय ? अशी भीती निर्माण झाली आहे. तर काढलेल्या सोयाबीनच्या गंज्या भिजू नये म्हणून ताडपत्र्यांनी झाकून ठेवल्याचे चित्र शेत शिवारात पहावयास मिळत आहे. पाऊस अधिक वाढल्यास उभ्या सोयाबीनसह काढून ठेवलेले सोयाबीनही हातचे जाणार असल्याचे चित्र तालुक्यासह जिल्ह्यात निर्माण झाले आहे.
कोरोनाच्या सावटात खरीप हंगाम साधणार्या शेतकर्यांवर आता निसर्गानेही निशाना साधला आहे. खरीपात जोमात वाढलेले पिके आता पावसाची शिकार होत आहेत. पेरणीनंतर भरघोस वाढलेली पिके पावसामुळे जमीनदोस्त होत आहेत. यावर्षी जूनपासूनच दमदार पावसाने सुरुवात केली. पेरण्या झाल्या आणि शेतात पिके काढणीला येऊन डोलत असतानाच सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात सर्वदूर दमदार पावसाला सुरुवात झाली होती. तब्बल दहा ते बारा दिवस सतत कोसळणार्या या पावसाने शेतात पाणीच पाणी करून टाकले. सर्व पिके पाण्याखाली गेल्याने पिके आडवी होऊन याचा सर्वाधिक फटका सोयाबीन पिकास बसला. शेंगानी लगडून गेलेल्या सोयाबीनच्या झाडावरच शेंगाना मोडे फुटून अतोनात नुकसान झाले.
सध्या शहरासह ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. ज्या शेतकर्यांनी दुबार, तिबार किंवा उशिराने पेरणी केली होती. त्या शेतकर्यांचे सोयाबीन आता काढणीस आले आहे. त्यामुळे जिल्हाभरात अर्ध अधिक सोयाबीन सवंगणी व मळणीच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढला तर उभे सोयाबीन सडून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. तर काढलेले सोयाबीन पावसाने भिजून खराब होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याने अनेक शेतकर्यांनी काढलेल्या सोयाबीनचा ढीग करून तो ढीग ताडपत्री किंवा प्लास्टिकने झाकून ठेवल्याचे चित्र शेत शिवारात पहावयास मिळत आहे. तर ज्या शेतकर्यांनी घाई गडबड करून सोयाबीन मळणी यंत्रामधून काढून घरी आणला आहे. या सोयाबीनमध्ये काही प्रमाणात ओलावा असल्याने व हे पिक अतिशय संवेदनशील असल्याने यातील ओलावा निघून जाण्यासाठी व ते वाळवण्यासाठी अनेक शेतकर्यांनी काढलेले सोयाबीन घरी आणले आहे. ते सोयाबीन पावसाच्या पाण्याने भिजू नये यासाठी मात्र शेतकर्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
























































