
सामना प्रतिनिधी। परभणी
यंदाच्या प्रखर उन्हाळ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. उष्णतेमुळे प्रचंड उकाडा वाढला आहे. दररोजचे तापमान सरासरी ४२ अंशांवर असल्यामुळे भूगर्भातील पाणीपातळी प्रचंड खालावली आहे. यामुळे परभणीत काही नगरसेवकांच्या आशिर्वादाने पाण्याचा गोरखधंदा जोरदार सुरू असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. एवढेच नाही तर शहरातील सुलभ शौचालय सुद्धा पाण्याअभावी बंद पडले आहेत.
शहरातील गांधी पार्क, गंगाखेड नाका, राजगोपालचारी गार्डन आदी ठिकाणी सुलभ शौचालयाची प्रत्यक्ष पाहणी केली असता, ते कुलूप बंद आढळून आले. पाणीच उपलब्ध होत नसल्यामुळे ही शौचालये बंद ठेवण्यात आल्याची नंतर माहिती मिळाली. शहरात मनपातर्फे अनेक मोक्याच्या ठिकाणी नागरिकांच्या सुविधेसाठी वेगळी शौचालये उभारली आहेत. ही मनपाची शौचालये सुद्धा बंद पडली आहेत. याकडे कुणाचेच लक्ष नाही. मनपा प्रशासनाकडून पिण्याच्या पाण्यासाठी तर 15 ते 16 दिवसाचा कालावधी लावला जातो. कधी कधी तर 18 दिवसानंतर सुद्धा पाणी येते. कधी अपुऱ्या विद्युत पुरवठ्याचे कारण दिले जाते. तर कधी बिघडलेल्या विद्युत मोटारी दुरुस्तीचे कारण दिले जाते. निवडणूकीपूर्वी चार दिवसाआड पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. आज तेच लोकप्रतिनिधी या पाणी प्रश्नांकडे ढुंकूनही पाहत नाहीत. निवडणूकीपूर्वीचे व निवडणुकीनंतरचे धोरण वेगळे असते. हे वारंवार परभणीकरांनी अनुभवले आहे.
ज्या ठिकाणी पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन नाही, त्या ठिकाणी परभणी मनपा तर्फे नियमीत मोफत पाणीपुरवठा केला जातो. परंतु ज्या कॉलनीमध्ये नागरिक पाणी पट्टी भरून नळाच्या पाण्याची वाट पाहतात त्यांना मात्र 16 ते 18 दिवस वाट पहावी लागते. काही नगरसेवकांनी आपल्या खास मर्जीतील लोकांना खाजगी टँकरचा धंदा चालू करून दिला आहे. तत्कालीन मनपा आयुक्त राहुल रेखावार यांनी पाण्याच्या टाकीवरील टँकर पूर्णपणे बंद केले होते. आता मात्र रेखावार जाताच पाण्याच्या टाकीवरील खाजगी टँकरही पून्हा सुरु झाले आहेत. याचा अर्थ राहुल रेखावार चुक होते की काय? असा खोचक प्रश्न चर्चीला जात आहे.
जिल्ह्यातही टंचाईचे उग्र रूप
जिल्हयाच्या ग्रामीण भागात पाणी टंचाई असल्याचा फायदा अनेकांनी उचलत पाणी विक्रीचा अक्षरश: बाजार मांडला आहे. पाणी पुरवठा योजनेवर शासनाचा करोडो रुपायांचा खर्च पाण्यात गेला आहे. पिण्याचे पाणी व धरणामधील पाणीसाठा याचा मेळ नीट न लावल्याने संपूर्ण जिल्यात पाणी टंचाईने उग्ररुप धारण केले असून जायकवाडी व लोअर दुधना प्रकल्पातून जिल्हयाला पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. असे न केल्यास जिल्हयात पाणी बळी पडल्याशिवाय राहणार नाही, असे चित्र दिसून येत आहे.

































































