परळच्या हिंदमाता उड्डाणपुलाखाली नो-एंट्री!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदमाता उड्डाणपुलाखालील जागा लवकरच पालिकेच्या माध्यमातून बंदिस्त केली जाणार आहे. परळ परिसरातील टाटा व अन्य रुग्णालयांतील रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांसाठी हिंदमाता उड्डाणपुलाखालील जागा आश्रयस्थान बनल्याने अस्वच्छता आणि रोगराई पसरण्याचा धोका असल्याचे सांगत नागरिकांकडून तक्रारी करण्यात येत होत्या. त्यामुळे पालिकेने हा निर्णय घेतला आहे.

परळ परिसरात टाटा रुग्णालयासह काही रुग्णालयांतील बडय़ा रुग्णालयांमध्ये देशभरातील गोरगरीब रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. परंतु रुग्ण संख्या वाढत असल्याने काही वेळा रुग्ण-नातेवाईकांची राहण्याची व्यवस्था होत नसल्याने आश्रयस्थानाचा शोध घ्यावा लागतो. मात्र गोरगरीब रुग्णांना मुंबईसारख्या महागडय़ा शहरात राहण्यासाठी सहजासहजी जागा उपलब्ध होत नसल्यामुळे रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक यांना हिंदमाता पुलाखाली आश्रय घ्यावा लागतो. परंतु हिंदमाता पुलाखाली राहणाऱया लोकांमुळे परिसरात अस्वच्छता पसरत असून स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ लागला आहे अशा तक्रारी पालिकेच्या एफ उत्तर विभागाकडे आल्या होत्या. अखेर नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत हिंदमाता पुलाखालील जागा बंदिस्त करण्याचा निर्णय पालिकेच्या उद्यान विभागाने घेतला आहे.

ही कामेही मार्गी लागणार

– पालिकेच्या एफ/उत्तर विभागातील दादरच्या जगन्नाथ शंकर शेठ उड्डाणपुलाखालील जागांचे सुशोभीकरण व विकास करणे.
– जगन्नाथ शंकर शेठ उड्डाणपुलाखालील उर्वरित दोन भाग, खोदादाद सर्कल व एफ/दक्षिण विभागातील जगन्नाथ शंकरशेठ उड्डाणपुलाखालील जागेलाही संरक्षक कुंपण घालण्यात येणार आहे.