
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा भार हलका करण्यासाठी मध्य रेल्वेच्या परळ वर्कशॉपच्या जागेवर दोन टप्प्यात लांबपल्ल्याच्या गाड्यांसाठी टर्मिनस बांधण्याची योजना मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाला सादर केली आहे. पहिल्या टप्प्यात एक आयलँड प्लॅटफॉर्म बांधण्यात येणार आहे, तर दुसर्या टप्प्यात एकूण सहा प्लॅटफॉर्म बांधण्याची योजना आहे.
परळ येथील 139 वर्षे जुन्या परळ वर्कशॉपच्या जागेवर लांबपल्ल्याचे टर्मिनस उभारण्याची महत्त्वाकांक्षी योजना मध्य रेल्वेने आखली आहे. 14 हेक्टर जागेवर सध्या मध्य रेल्वेचे परळ वर्कशॉप उभे असून या वर्कशॉपला येथून हटवून येथील कामगारांना दुसरीकडे नेमणूक देण्यात येणार आहे. तसेच येथील कामे राज्यातील व देशातील इतर रेल्वेच्या कारखान्यात वर्ग केली जाणार आहेत. येथील दोन हजार कामगारांना मुंबईबाहेर हलवण्यात येणार नसल्याचा दावा मध्य रेल्वेने अलीकडेच केला होता.
डॉ. आंबेडकर मार्गावरून थेट उन्नत मार्गाने प्रवेश
मध्य रेल्वेने परळ टर्मिनसकरिताचा विस्तृत प्रकल्प अहवाल रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. पहिल्या टप्प्यात 230 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. त्यातून आयलँड प्लॅटफॉर्म बांधण्याची योजना असून त्यांच्या दोन्ही बाजूला 1 आणि 2 प्लॅटफॉर्म बांधण्यात येणार आहेत. गाड्यांच्या देखभालीसाठी दोन स्टॅबलिंग लाईन बांधण्यात येणार आहेत. टर्मिनसमध्ये प्रवाशांना प्रवेश करणे सोपे जाण्यासाठी डॉ. आंबेडकर मार्गावरून वाहनांना थेट प्रवेश देण्यासाठी उड्डाण पूल बांधण्याची योजना आहे. त्यानंतर दुसर्या टप्प्यात 980 कोटी रूपयांचा खर्च करण्यात येऊन आणखीन चार प्लॅटफॉर्म बांधण्यात येणार आहेत.


























































