
कोरोनावर लस आल्याशिवाय शाळा सुरू करू नये अशी मागणी पालक वर्गातून होत आहे. नुकतेच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचा विचार केला जाईल असे म्हटले होते. यावर पालकवर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून लस आली नसताना शाळा सुरू करण्याची घाई का? विद्यार्थ्यांना बाधा झाल्यास जबाबदार कोण असा सवालही एका पालकाने शिक्षणमंत्र्यांना ट्विटरवर केला आहे.
कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी सरकारने ऑनलाईन शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागल्यानंतर आता शाळा सुरू करण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मात्र, शिक्षक भारती संघटनेने लस आल्याशिवाय शाळा सुरू करू नयेत, अशी भूमिका घेतली आहे.
याबरोबरच पालकांकडूनही कोरोना लस येण्यापूर्वी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेऊ नये, अशी मागणी होत आहे. अजून लस आली नाही, आणि यांना शाळा सुरू करायची घाई लागली आहे. विद्यार्थ्यांना लागण झाल्यास शाळा व्यवस्थापन व शिक्षणमंत्री यांनी लेखी जबाबादरी घ्यावी, असे ट्विट प्रसाद तुळसकर यांनी शिक्षणमंत्र्यांना केले आहे. तर सचिन गवळी यांनी शाळा सुरू करण्याची एवढी का घाई ? असा सवाल उपस्थित केला आहे. मुजोर शाळांवर कारवाई करा असे त्यांनी ट्टिट केले आहे.


























































